नागपूर : शहरात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळत आहे. शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संभाव्य धोका टाळता यावा यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. या अनुषंगाने मनपाची सर्व रुग्णालये सज्ज ठेवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी आरोग्य विभागाला दिले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी विभागाला यासाठी निर्देश दिले होते. आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी मनपाच्या विविध रुग्णालयांमध्ये भेट देत वैद्यकीय आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी इंदिरा गांधी रुग्णालय ,गांधी नगर, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि आयसोलेशन रुग्णालयाची पाहणी केली व येथील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ऑक्सिजन आणि खाटांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
यादरम्यान जोशी यांच्यासोबत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सुनील उईके, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आणि त्या त्या झोनचे कार्यकारी अभियंता तसेच झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य विभागाला ऑक्सिजन पाईपलाईनची तपासणी करणे, स्वच्छता राखणे, तसेच कोरोनाबाधित रुग्णाला भरती करण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश जोशी यांनी आरोग्य विभागाला दिले आहे.
महानगर पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये ८० ऑक्सिजन खाटा असून १६ आयसीयू बेड्स यासोबतच पीएसए प्लांट आहे. तसेच आयसोलेशन रुग्णालयामध्ये ३० ऑक्सिजन बेड्स असून इथे सुद्धा पीएसए प्लांट आहे. पाचपावली स्त्री रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन प्लांट असून ११० ऑक्सिजन बेड्स आहेत. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी व नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने युद्ध स्तरावर प्रयत्न सुरु केले आहे. याच अनुषंगाने कोरोनाबाधित रुग्णांना सर्व प्रकारच्या सोई -सुविधा पुरवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी आरोग्य विभागाला दिले.