नागपूर : जिल्हा प्रशासन आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) पुढाकारामुळे प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमधील ‘पॉलिमरेज चेन रिअॅक्शन’ (पीसीआर) हे यंत्र मंगळवारी मेयोला उपलब्ध झाले. या यंत्रामुळे एकाच दिवशी २५० वर नमुने तपासण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘तीन प्रयोगशाळेनंतरही चाचणीचा वेग संथच’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यात रोज ३०० वर तपासणी होण्याची गरज असताना, २०० ही तपासण्या होत नसल्याचे वास्तव मांडले. प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतही कोरोना तपासणी होऊ शकते किंवा येथील यंत्र मेयो किंवा एम्सच्या प्रयोगशाळेला उपलब्ध झाल्यास चाचणीचा वेग वाढू शकतो, असे नमूद केले होते.
शासानाने याची दखल घेतल्याने प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे यंत्र मेयोला उपलब्ध होऊ शकले. मेयोमध्ये जुने आणि नवीन असे दोन यंत्र आहेत. जुन्या यंत्रावर १८ पेक्षा जास्त व नव्या यंत्रावर ३० पेक्षा जास्त नमुने तपासणे शक्य होत नव्हते. या एका सायकलला पाच ते सहा तासाचा वेळ लागतो. यामुळे दिवसभरात १०० वर नमुने तपासले जात नव्हते. शिवाय प्रयोगशाळेकडे नागपूरसह गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्याचा भार होता. यामुळे नागपुरातील जास्तीत जास्त नमुने तपासणे शक्य होत नव्हते. परंतु आता मेयो आणि एम्सकडे नागपूर शहर व ग्रामीणचे नमुने तपासण्याच्या नव्या सूचना आल्या आहेत. यात आणखी एक यंत्र उपलब्ध झाल्याने नमुने तपासण्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पुढील दोन दिवसात यंत्र रुग्णसेवेत
प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून त्यांचे ‘पॉलिमरेज चेन रिअॅक्शन’ (पीसीआर) हे यंत्र मेयोच्या प्रयोगशाळेत उपलब्ध झाले आहे. पुढील दोन दिवसात हे यंत्र रुग्णसेवेत सुरू होईल. यामुळे नमुन्यांचा चाचणीची संख्या नक्कीच वाढेल. याचा फायदा रुग्णसेवेला होईल.
– डॉ. अजय केवलिया अधिष्ठाता, मेयो.