कोव्हिड लसीकरणासाठी घेतलेले अतिरिक्त शुल्क करणार परत
नागपूर: कोव्हिड लसीकरणासाठी अतिरिक्त शुल्क घेण्यात येत असल्याच्या तक्रारीवरून मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे शंकर नगर येथील व्होकार्ड हॉस्पीटलला दणका दिला आहे. मनपाने दिलेल्या कारवाईच्या इशा-यानंतर कोव्हिशिल्ड लसीकरीता आकारण्यात येत असलेल्या निर्धारित शुल्कापेक्षा घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याबाबत व्होकार्ड हॉस्पीटल प्रशासनाद्वारे मान्य करण्यात आले आहे.
कोव्हिड लसीकरणासाठी खासगी लसीकरण केंद्रांवर ७८० रुपये शुल्क आकारणे अपेक्षित असताना व्होकार्ड हॉस्पीटलकडून १०५० रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याची तक्रार शिवानी चौरसिया यांनी मनपाच्या आरोग्य विभागाकडे केली. त्यांच्या तक्रारीवरून मनपाद्वारे हॉस्पीटल प्रशासनाला २४ जुन, २०२१ रोजी पहिली नोटीस बजावली. त्यानंतर हॉस्पीटल प्रशासनाकडून कुठलेही उत्तर न मिळाल्याने आरोग्य विभागाने नुकतेच स्मरणपत्र पाठवून कुठलेही स्पष्टीकरण न दिल्यास मनपाद्वारे एकतर्फी कारवाई करण्याबाबत इशारा दिला.
मनपाच्या इशा-यानंतर व्होकार्ड हॉस्पीटलद्वारे २१ जुलै रोजी पत्राद्वारे उत्तर देत चूक मान्य करण्यात आली. रुग्णालय प्रशासनाच्या धोरणानुसार २७० रुपये हे नोंदणी शुल्क म्हणून आकारण्यात येत असल्याचे रुग्णालयाद्वारे सांगण्यात आले. मात्र आता मनपा प्रशासनाच्या निर्देशानुसार निर्धारित ७८० रुपये एवढेच शुल्क प्रत्येक लसीकरणासाठी आकरण्यात येतील. शिवाय यापूर्वी ज्यांच्याकडून लसीकरणासाठी १०५० रुपये शुल्क आकारण्यात आले त्यांचे अतिरिक्त शुल्क परत करण्यात येत असल्याचेही हॉस्पीटल प्रशासनाद्वारे स्पष्टीकरणात सांगण्यात आले आहे.