Published On : Thu, Feb 4th, 2021

सायकल रॅली काढून मनपाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी केली कर्करोग जनजागृती

Advertisement

नागपूर : जागतिक कर्करोग दिनानिमित्त गुरूवारी (ता.४) मनपा व नागपूर स्मार्ट सिटीच्या अधिकारी व कर्मचा-यांनी सायकल रॅली काढून कर्करोग जनजागृती केली. सकाळी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीईओ भुवनेश्वरी एस., मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे जवान व अमेरीकन ऑन्कोलॉजिस्ट इन्स्टिट्यूटचे डॉक्टरांनी आकाशवाणी चौक ते मनपा मुख्यालयापर्यंत सायकल रॅली काढली.

यावेळी उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक आयुक्त महेश धामेचा, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे, अमेरिकन ऑन्कोलॉजिस्ट इन्स्टिट्यूटच्या नांगीया स्पेशॅलिटी हॉस्पीटलचे मेडिकल सुप्रिइन्टेडेंट डॉ. सुहास चौधरी, ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रोशन जेकब, डॉ. धनंजय बोकारे, डॉ. अंकिता उपाध्याय आदींनी या जनजागृती सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदविला.

Gold Rate
Thursday 16 Jan. 2025
Gold 24 KT 79,000 /-
Gold 22 KT 73,500 /-
Silver / Kg 92,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एनएसएससीडीसीएलच्या सीईओ भुवनेश्वरी एस. यावेळी म्हणाल्या, कर्करोग संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे असून नागरिकांनी आपली जीवनशैली त्यादृष्टीने बदलविण्याचे आवाहन केले. नागरिकांनी वाईट सवयी, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळून स्वत:सह आपल्या कुटुंबाचेही संरक्षण करावे, असेही त्यांनी आवाहन केले.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, महिन्यातून एकदा सायकलने कार्यालयात येण्याचा मनपाने निर्णय घेतला असून आरोग्य जागृतीबाबत खारीचा वाटा उचलला आहे. जागतिक कर्करोग दिनानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचारी पुन्हा एकदा सायकलने कार्यालयात पोहोचले आहेत. कर्करोग संदर्भातही आपण गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. देशातील वाढती कर्करुग्णांची संख्या आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न व्हावा यासाठी मनपाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील ऑन्कोलॉजिस्टचा सहभाग हा सकारात्मक संदेश देणारा आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याविषयी सतर्क व जागरूक राहून वेळीच उपचार घ्यावा, असेही आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.

ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रोशन जेकब यांनी कर्करोगाच्या कारणांची माहिती दिली. यावर्षी जागतिक कर्करोग दिनाची थीम ‘आय एम, आय विल’ ही आहे. आज प्रत्येकाने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी आवश्यक आहे. आपल्याला काही लक्षणे आढळल्यास सुरूवातीलाच त्याची चाचणी करण्यासाठी पुढे यावे. सुरूवातीच्या काळातच कर्करोगाचे निदान झाल्यास त्यावर यशस्वीपणे मात करता येते. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, धुम्रपान, मद्यमान टाळावे, नियमीत व्यायाम करावा, पौष्टीक आहार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement