बुधवारपासून ‘कोव्हिड संवाद’ : नागरिकांच्या शंकाचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून होणार निरसन
नागपूर : कोव्हिड्-१९च्या संक्रमण काळात प्रशासकीय यंत्रणेला सर्वच यंत्रणांनी मदतीचा हात दिला. या काळात नागपूरकरांच्या मनात असलेल्या कोव्हिडविषयीच्या अनेक शंका आणि प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आय.एम.ए. धावून आली. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आय.एम.ए.च्या सहकार्याने ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे सतत दोन महिने आयोजन करण्यात आले. यातून नागरिकांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत झाली. सप्टेंबर पासून यामध्ये प्रारंभी ९५ डॉक्टर समुपदेशनासाठी होते.
त्यानंतर शहरातील १४० प्रतिष्ठीत डॉक्टरांची नि:शुल्क सेवा समुपदेशनासाठी उपलब्ध झाली व सातत्याने हे काम सुरु असल्यामुळे त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या सुचनांमुळे आवश्यक त्या त्रुटी दुर करण्यास मदत झाली. अश्याप्रकारे आय.एम.ए. तर्फे यापूर्वी ११२६६४ नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. आता कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महापौर दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकाराने आय.एम.ए. ‘कोव्हिड संवाद’ करणार असून नागरिकांच्या मनातील प्रश्नांना तज्ज्ञ डॉक्टर्स ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून उत्तरे देणार आहेत.
बुधवार दि. २४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आय.एम.ए.च्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी आणि सचिव डॉ. राजेश सावरबांधे हे कोव्हिड संवाद कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित राहतील. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या ‘कोव्हिड संवाद’ कार्यक्रमाचा विषय ‘कोव्हिड-१९ लसीकरण’ हा राहणार आहे. एक तासाच्या या ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात नागरिकांनी विषयाशी निगडीत प्रश्न विचारावेत. त्या प्रश्नांना तज्ज्ञ मंडळी उत्तरे देतील, असे आवाहन करण्यात आले आहे.
या व्यतिरिक्त नागरिकांच्या मनात कोव्हिड विषयी असलेल्या अनेक प्रश्नांना आय.एम.ए.चे सदस्य उत्तरे देतील. यासाठी स्वतंत्र समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी लवकरच आय.एम.ए. तर्फे डॉक्टरांच्या मोबाईल क्रमांकाची यादी उपलब्ध वेळेसह जाहीर करण्यात येईल. संबंधित डॉक्टरांना रुग्णांनी त्या वेळेत फोन केल्यास आय.एम.ए.च्या सदस्यांतर्फे त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल.
सदर बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आय.एम.ए.च्या अध्यक्षा डॉ. अर्चना कोठारी, सचिव डॉ. राजेश सावरबांधे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त सहायक आरोगय अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.