नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने गस्तीदरम्यान गुप्त माहितीवरून वाठोडा परिसरात एमडी तस्करी प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली.पोलिसांनी त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि 13 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
एमडी तस्करी प्रकरणात त्याचा आणखी एक साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. या आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नागपूरच्या पाच पावली पोलिस ठाण्यांतर्गत NDPS पथकाने 16 जूनच्या रात्री एमडी तस्करी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली होती.
या प्रकरणात त्याच्याकडून सुमारे 306 ग्रॅम एमडी सापडले. चौकशीत या गुन्ह्यात जुबेर अफसर शेख, सानू सलाउद्दीन काझी आणि शेख अतीक या आरोपींचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हापासूनच पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता.
काल रात्री गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला पुन्हा एकदा या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी शेख अतिक हा शांतीनगर येथील वाठोडा परिसरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून शेख अतिक याला अटक केली. त्याची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि १३ जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.