मुंबई: देशात रेल्वे अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. पंतप्रधान मोदी देशातील जनतेला सुरक्षित रेल्वे प्रवास देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. रेल्वे खाते फक्त ट्विटरवर काम करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना केला. देशातील वाढत्या रेल्वे अपघातांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना मलिक असे म्हणाले की रेल्वे अपघात वाढत आहेत म्हणून सुरेश प्रभू यांना केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. प्रभूंनंतर पियुष गोयल यांची रेल्वे मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती झाल्यानंतरही शक्तीपुंज एक्सप्रेस, रांची राजधानी एक्सप्रेस या गाड्यांचे अपघात झाले.
तीन वर्षांत या सरकारने जनतेच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे असा आरोप त्यांनी केला. या सर्व अपघातांची जबाबदारी ही मोदी सरकारची आहे. लोकांना बुलेट ट्रेन नाही सुरक्षित प्रवास हवा आहे असे ते म्हणाले.