नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) महाल येथील मुख्यालयाची रेकी करून पाकिस्तानातील उमरला माहिती पाठविणारा दहशतवादी रईस अहमद शेखचा जामीन अर्ज शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला. हा निर्णय न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी दिला.
रईस हा जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पोरा गावचा रहिवासी आहे. तो बंदी घातलेल्या दहशतवादी संघटने जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवल्यानंतर त्याच्या कारवाया उघडकीस आल्या. त्याच्या मोबाईल आणि डिजिटल उपकरणांवरून मिळालेल्या माहितीनुसार, त्याने संघाच्या मुख्यालयाची रेकी केली होती आणि तेथून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवली होती.
राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील आणि मुख्य सरकारी वकील देवेंद्र चव्हाण यांनी न्यायालयासमोर रईसचे दहशतवादी संबंध आणि त्याचा मागील गुन्हेगारी इतिहास नमूद केला. त्यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये जिवंत हँडग्रेनेड बाळगल्याबद्दल रईसविरुद्ध आधीच गुन्हा दाखल आहे.
उपलब्ध पुरावे गंभीर असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने म्हटले की, हे प्रकरण केवळ जामिनापर्यंत मर्यादित नाही तर ते देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. न्यायालयाने असेही स्पष्ट केले की रईसला तुरुंगात ठेवणे राष्ट्रीय हितासाठी आवश्यक आहे.