नागपूर : साधारणत: पाऊस आल्यानंतर त्याचा थंडावा अनुभवण्यासाठी नागपुरकर घराबाहेर निघताना दिसून येतात. परंतु बुधवारी सायंकाळी आलेल्या पावसाचे नागरिकांना घरातूनच दर्शन घेता आले. ‘कोरोना’मुळे शहर ‘लॉकडाऊन’ झाले असताना अचानक पाऊस आला. या पावसामुळे नागरिकांमधील चिंता वाढली असून ‘व्हायरल फीव्हर’चा धोका वाढीस लागला आहे.
नागपुरात बुधवारी सायंकाळी वातावरण निरभ्र होते व आर्द्रता ३२ टक्के होती. मात्र काही वेळातच वातावरण बदलले व सायंकाळी सातच्या सुमारास १५ ते २० मिनिटे पाऊस आला. काही भागात पावसाचा जोर जास्त होता. नागपुरात कमाल ३७.३ अंश सेल्सिअस तर किमान २०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार २६ मार्च रोजी विदर्भातील बहुतांश भागामध्ये वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो. तर २७ मार्च रोजीदेखील काही भागात याचा परिणाम दिसून येईल. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.