नागपूर : शहरातील कोरोना बाधितांसह मृत्यू संख्या देखील वाढत आहे. रविवारी (ता. १७) सकाळी आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. सदर रुग्ण शांतिनगर भागातील रहिवासी होता. याचबरोबर नागपुरातील मृत्युसंख्या सहा झाली आहे. तसेत रविवारी आणखी १३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांचा भर पडली असून हे सर्वजण आधीच विलगीकरणात आहेत. नागपुरातील रुग्णांची एकूण संख्या आता ३५४ झाली आहे.
रविवारी सकाळी घरी अस्वस्थ वाटत असलेल्या शांतिनगर भागातील एका रुग्णाला मेयो रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृ्त्यू झाला होता. दरम्यान कोरोनाचा हॉटस्पॉट असल्यामुळे मेयो रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत मृत रुग्णाचा थ्रोट स्वॅब नमुना घेतला. त्याची तपासणी केली असता तो नमुना पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. दुसरीकडे रविवारी आणखी १३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांचा भर पडली. हे सर्वजण सतरंजीपुरा व मोमिनपुरा भागातील रहिवासी असून आधीच विलगीकरणात आहेत. आता नागपुरातील रुग्णांची एकूण संख्या आता ३५४ झाली आहे.
उपराजधानीत कोरोनाच्या बाधेमुळे दोन महिन्यात झालेल्या सहा मृत्यूंमध्ये तीन जण साठीच्या वर आहेत, तर दोन युवक आहेत. सतरंजीपुरा येथील 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. तो नागपुरातील पहिला मृत्यू होता. यानंतर मोमीनपुरा येथील 70 वर्षे वयाचा वृद्ध दगावला होता. यानंतर रामेश्वरी-पाचपावली येथील 22 वर्षीय युवकाचा 5 मे तर पांढराबोडी येथील 29 वर्षीय युवकाचा 11 मे रोजी मृत्यू झाला.
सर्व वयोगटात कोरोनाचा संसर्ग
लहान मुलांना तसेच वयस्कांना सर्वाधिक कोरोना संसर्गाची जोखीम असल्याचे वैद्यक तज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते. मात्र शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये 9 महिन्याच्या चिमुकल्यापासून तर 70 वर्षे वयोगटातील वृद्ध व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. विशेष असे की, तरूण वयातील रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग केवळ वयोवृद्ध आणि लहान मुलांना अधिक होतो, हा समजही यानिमित्ताने खोटा ठरला आहे. संचारबंदी शिथिल करण्यात आल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.