Published On : Fri, Jun 4th, 2021

कोविडची तिसरी लाट येवो न येवो पण गाफील राहू नका : ना. गडकरी

Advertisement

भाजपा प्रदेश वैद्यकीय आघाडीशी संवाद

नागपूर: कोविडची तिसरी लाट येवो न येवो, पण या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी करा. गाफील राहू नका. विशेषत: कोविड संक्रमणाच्या काळात सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण होईल, यासाठी डॉक्टर मंडळीच अधिक प्रभावशाली कार्य करू शकतात, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भाजपा प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकार्‍यांशी आभासी कार्यक्रमाच्या माध्यमातून ना. गडकरी संवाद साधत होते. या कार्यक्रमात डॉ. अशोक कुकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- विश्वावर आलेले हे संकट आहे. दोन लाटानंतर आपण खूप शिकलो आहे. पहिल्या लाटेच्या वेळी आपल्याकडे सोयीसुविधा नव्हत्या. म्हणून तिसरी लाट आली तर आपण सामना करण्याच्या पूर्ण तयारीत असलो पाहिजे. थोडेही लक्षणं दिसले की लगेच तपासणी केली पाहिजे, असे सांगून ना. गडकरी यांनी मोबाईल तपासणी प्रयोगशाळा, ऑक्सीजनची व्यवस्था, रेमडेसीवीर इंजेक्शनची व्यवस्था आणि अ‍ॅम्फोटेरेसिन इंजेक्शन निर्मितीची व्यवस्था, अ‍ॅम्ब्युलन्स व्यवस्था कशी केली याची माहिती यावेळी दिली.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ऑक्सीजन निर्मितीत आपण आत्मनिर्भर असले पाहिजे असे सांगून ना. गडकरी म्हणाले- सिलेंडरचा तुटवडा आपल्याकडे होता. पण आता काहीशी सवड मिळाली असताना प्रत्येक डॉक्टरांनी आपल्याला पाहिजे त्यापेक्षा दुप्पट सिलेंडरची व्यवस्था केली पाहिजे. हवेतून ऑक्सीजन तयार करण्याचे प्लाण्ट तयार करण्यावर आपला भर आहे. तसेच बंद दवाखान्यांचा उपयोग करीत डॉक्टरांनी रुग्णशय्या वाढविण्याचा प्रयत्न करावा. आवश्यक उपकरणासह युक्त आपले हॉस्पिटल व्हावे असे प्रयत्न डॉक्टरमंडळींनी करावेत, असेही ते म्हणाले.

कोविड संक्रमणाच्या काळात ज्या उपचारांमुळे फायदा होईल ते उपचार आपण केले पाहिजेत, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आपल्याला फायदा झाला तर तो अनुभव इतरांपर्यंत आपण पोहोचवावा. प्रत्येकाला वॅक्सीन घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आपल्या कार्यकर्त्यांची राष्ट्रीय व सामाजिक जबाबदारी ठरते.

सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी राजकारण हे प्रभावी माध्यम आहे, हे लक्षात घेऊन दीनदलितांची सेवा हाच खरा धर्म असून ही सेवा निरपेक्ष भावनेने करावी, असे सांगून ते म्हणाले- सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची सेवा करणे हा अंत्योदयाचा विचार आहे. आपला उद्योग, व्यापार सांभाळून आपल्याला हे कार्य करायचे आहे. कोविडच्या संकटावर मात करून आपण विजयी होऊ असा विश्वास समाजात निर्माण होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement
Advertisement