नागपूर: क्रिकेट सट्ट्यातून पैशातून उद्भवलेल्या भांडणातून क्रिकेट बुकीच्या खुनातील आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली.
श्रीकांत महादेवराव थोरात, राजेश ऊर्फ अन्ना मधुकरराव म्हस्के, राजू ऊर्फ बल्ली परसराम शेंडे, रोशन ऊर्फ गोट्या अशोक मोहिते, आशिष ऊर्फ नटखट दिलीप काळे आणि राहुल ऊर्फ बामण्या मधुकर गणवीर अशी निर्दोष सुटका करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शीतल श्यामराव राऊत असे मृताचे नाव आहे. शीतल राऊत हा क्रिकेट बुक चालवायचा व आरोपी त्यांच्याकडे खायवाडी करायचे.
दरम्यान शीतल यांनी आरोपींकडे उधार १० लाख रूपयांची मागणी केली. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातून १५ डिसेंबर २०१४ ला आरोपींनी संगनमत करून म्हाळगीनगर चौक ते हुडकेश्वर मार्गावर एका पानठेल्याजवळ शीतलचा धारदार शस्त्रांनी भोसकून खून केला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी खुनाचा गु्न्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून सर्व आरोपी कारागृहात आहेत.
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. घुगे यांच्यासमक्ष झाली. सरकारी पक्षाने एकूण २५ साक्षीदार तपासले. बचाव पक्षांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गुप्ता आणि ॲड. आर. के. तिवारी यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. साक्षीदारांचे जबाब व सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी आरोपींची निर्दोष सुटका केली.
क्रिकेट बुकी व पोलीस विभागात खळबळ
क्रिकेट सट्टा जगतात अजय राऊत, शीतल राऊत यांचे नाव मोठे होते. या हत्याकांडानंतर उपराजधानीतल क्रिकेट सट्टा जगत व नागपूर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शहरातील क्रिकेट बुकींवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून क्रिकेट सट्टा नेहमीच पोलिसांच्या रडारवर राहिला आहे.