नागपूर : तपास यंत्रणेतील एका एएसआयविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षा दलात काम करणाऱ्या एका तरुणीला नोकरी तसेच लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्याच्या त्याच्यावर आरोप आहे. अमितकुमार शर्मा (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) मध्ये काम करतो. तो धनबाद, झारखंड येथील रहिवासी असून, सध्या दिल्लीत कार्यरत असल्याचे गणेशपेठ पोलीस सांगतात. तक्रार करणारी तरुणी (वय २६) मूळची सावनेरची आहे. ती राज्य सुरक्षा दल (एमएसएफ) काम करते. धनबाद येथे कार्यरत असताना तरुणीची तीन वर्षांपूर्वी शर्मा सोबत ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
तरुणीने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे शर्माने यावेळी तिला गुंगी येणारा पदार्थ खाऊ घातला आणि तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शरीरसंबंध जोडू लागला. तो लग्न करणार असल्याची खात्री असल्याने तरुणी गप्प राहायची.
शर्माने तिला चांगल्या नोकरीसोबत लग्नाचेही आमिष दाखवले. त्यानंतर ते एकमेकांसोबत इकडे तिकडे जाऊ लागले. दोन वर्षांपूर्वी ती आपल्या गावी सावनेरला आली. ५ एप्रिल २०१६ ला नागपुरात आल्यानंतर ते दोघे सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल राजहंसमध्ये २०२ क्रमांकाच्या रूममध्ये थांबले. ५ एप्रिल २०१६ ते १५ मे २०१८ या कालावधीत त्यांच्यात वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर लग्नाचा विषय निघताच शर्मा तिला टाळू लागला. बदनामीची धमकी देऊ लागला. त्याने विश्वासघात केल्यामुळे तरुणीने गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
पीएसआय यू. एन. मडावी यांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, गुप्तचर यंत्रणेत कार्यरत व्यक्तींचा सामान्य नागरिकांशी फारसा संबंध येत नाही. ते गोपनीय आणि ओळख लपवूनच काम करतात. शर्माने कशी काय ओळख जाहीर केली, ती बाब पोलीस अधिकाऱ्यांनाही धक्का देणारी ठरली आहे.