नागपूर : नागपूरच्या एम्स रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला. या रुग्णालयात मोठा इंजेक्शन घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून हॉस्पीटल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हा घोटाळा उघडकीस येताच सोनेगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
माहितीनुसार, आमआरआय करण्यासाठी तीन रुग्ण गेले. त्यावेळी तिघांनाही एक एक इंजेक्शन खरेदी करायला सांगितलं. त्यांनी सांगितल्या प्रमाणे तीन इंजेक्शन खरेदी केली. पैसेही दिले आणि रुग्णालयात आले. त्यानंतर त्यांच्याकडून हे इंजेक्शन घेतली मात्र दोन इंजेक्शन न फोडता परत दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आले. तर एकच इंजेक्शन तीन रुग्णांना देण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच रुग्णालयात सुरु असलेला सर्वात मोठा घोटाळा समोर आला.
ग्राहकांकडून इंजेक्शनचे पैसे द्यायला लावायचे आणि पुन्हा तीच इंजेक्शन दुकानात नेऊन ठेवायचे. ग्राहकांकडून ज्यादाचे इंजेक्शन किंवा तीन इंजेक्शन खरेदी करायला सांगायचे. हा सगळा प्रकार एमआरआय करणाऱ्यांनी समोर आणला असून याप्रकरणी पोलिसांना दोन आरोपींना अटक केली आहे. दलालांच्या माध्यमातून हे इंजेक्शने परत खरेदी केले जायचे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची एम्स प्रशासनाने हकालपट्टी करत पोलिसात तक्रार दिली.