मुंबई : पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे अर्थसंकल्पीय अधिवेशनात बांधकाम कामगार योजनेंतर्गत कोट्यवधीं रुपयांचा घोटाळा करण्यात येत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.बांधकाम कामगारांसाठी वितरित करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साहित्याच्या वितरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठाकरे यांनी सभागृहात केला.
ठाकरे यांनी माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या लाभार्थ्यांच्या यादीचा उल्लेख करत सांगितले की, या यादीत नोंद असलेले बहुतांश लाभार्थी बांधकाम कामगार नसून त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. यामुळे या योजनेंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे बांधकाम कामगार योजना ?
बांधकाम कामगार योजने अंतर्गत ३२ प्रकारच्या योजनेचा लाभ या बांधकाम कामगारांना दिला जातो. या योजनेत भांड्यांचा सेट, पेटी, कामगारांच्या मुलांच्या लग्नासाठी खर्च तसेच इतर भरपूर योजना या बांधकाम कामगारांना मिळतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र या योजनेअंतर्गत बोगस नोंदणी करण्यात येत असल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांचे कल्याण वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (MBOCW) सारख्या संस्थांची स्थापना समाविष्ट आहे. या मंडळामार्फत विविध क्षेत्रातील बांधकाम कामगाराची नोंद केली जाते तसेच त्यांना सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच आर्थिक सुविधा पुरविल्या जातात व अनेक योजनांचा लाभ दिला जातो. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी 84 प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात ज्यामध्ये सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना, आरोग्य विषयक योजना, आर्थिक योजनांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे.