नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात सायबर गुन्ह्यांचा आलेख वाढतच चालला आहे. यासंदर्भात सायबर पोलिसांकडून २०२४ मध्ये छडा लावण्यात आलेल्या सायबर गुन्ह्यांशी संबंधित आकडेवारी मांडण्यात आली. यावरून शहरात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येते.
वर्षभरात १३ हजार १४ तक्रारींची नोंद –
१ जानेवारी ते १५ डिसेंबरदरम्यान ‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल’वर नागपूरशी संबंधित आर्थिक फसवणुकीच्या एकूण १३ हजार १४ तक्रारी नोंदविल्या गेल्याची माहिती समोर आली आहे.
नागरिकांची ९१ कोटी ५९ लाख ७७ हजार ११६ रुपयांनी फसवणूक-
सायबर पोलिस ठाण्याकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सायबर गुन्हेगारांकडून शहरातील नागरिकांची ९१ कोटी ५९ लाख ७७ हजार ११६ रुपयांनी फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणांचा छडा लावत पोलिसांनी तक्रारींच्या तपासानंतर गुन्हेगारांच्या विविध खात्यांतील एकूण १८ कोटी ४१ लाख ७० हजार ३८५ रुपयांची रक्कम फ्रिज न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यातील २ कोटी ७२ लाख २८ हजार ९४२ रुपये तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आले. ही रक्कम फसवणूक झालेल्या रकमेच्या पाच टक्केही नाही.
नागपूर शहर सायबर पोलिस ठाण्यांत दाखल १४४ प्रकरणांचाही समावेश-
‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल’वर जाहीर केलेल्या आकडेवारीत नागपूर शहर सायबर पोलिस ठाण्यांत दाखल १४४ प्रकरणांचाही समावेश आहे. यागुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम ५० कोटी ६ लाख ६९ हजारांच्या घरात आहे. त्यापैकी २८ कोटी ५६ लाख ६१ हजार ५७ रुपयांची रक्कम असलेले खाते फ्रिज करण्यात आले. गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ३३ परप्रांतीय गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर ३ कोटी ७५ लाख ५५ हजार ९९९ रुपये तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आले.
सोशल मीडियाशी संबंधित आक्षेपार्ह पोस्टच्या ७५९ तक्रारी प्राप्त –
सायबर गुन्ह्याशी संबंधित नळीने तक्रारीसोबतच फेसबूक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, एक्स, टेलिग्राम यासारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर महिला व बालकांशी संबंधित आक्षेपार्ह पोस्टच्या ७५९ तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यांची तत्काळ दखल घेऊन आक्षेपार्ह पोस्ट डिलिट करण्यात येत आहेत.
दरम्यान नागपुरातील सायबर गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी सायबर पोलीस विभाग प्रयत्नशील आहे. वर्षभरात करण्यात आलेली ही कारवाई संजय पाटील(अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर), लोहीत मतानी (पोलीस उप आयुक्त, सायबर तथा परिमंडळ क्र1.) यांच्या मार्गदर्शनात अमित डोळस( वरिष्ठ पोलीस निरीक्षक) , अमोल देशमुख (पोलीस निरीक्षक व सायबर टिम )यांचे सहकार्याने तांत्रीक कौशल्याचा वापर करून पार पाडली आहे.