मुंबई: सुमित मलिक यांच्या जागी राज्याच्या मुख्य सचिवपदी डी.के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जैन यांच्या निवडीमुळे सेवाज्येष्ठता असूनही महिला अधिकाऱ्याची मुख्य सचिवपदाची संधी हुकल्याची चर्चा मंत्रालयात सुरू आहे.
राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र जैन यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या गाडगीळ यांना डावलून जैन यांना मुख्य सचिवपद देण्यात आले आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठता असूनही महिला अधिकाऱ्याची मुख्य सचिवपदाची संधी हुकल्याची मंत्रालयात चर्चा आहे. राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक आज निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याकडे मुख्य सचिवपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.
दरम्यान, कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेले डी. के. जैन हे १९८३ च्या बॅचचे सनदी अधिकारी असून ते येत्या ३१ जानेवारी २०१९ रोजी निवृत्त होणार आहेत.. जैन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याने वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी यु.पी.एस. मदान यांच्याकडे दिली जाईल, असे सुत्रांनी सांगितले. मदान हे सध्या एमएमआरडीएचे आयुक्त आहे.