नागपूर: कन्हान नदीचा प्रवाह अडवून बांध तयार करा म्हणजे पाण्याचा संचय होईल, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. गुरूवारी (ता.२४) मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांच्यासह कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्राची त्यांनी पाहणी केली.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेवक पिंटु झलके, मनोज सांगोळे, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व आयुक्त अश्विन मुदगल यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. नदीच्या प्रवाहात बांध तयार करण्यात यावे. जेणेकरून पाण्याचा संचय होईल व भविष्यातील पाणी टंचाई थांबविण्यासाठी त्याचा उपयोग होईल. नदीच्या आसपास असलेल्या दगडाने बांध तयार करा. तात्पुरती सोय होईल, अशी व्यवस्था तयार करा असे निर्देश कार्यकारी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कन्हान जलशुद्धीकरण केंद्रात सद्यस्थितीत २०८ एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण करणे सुरू असून या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता एकूण २४० एमएलडी इतकी आहे. उन्हाळ्यात पाण्याची क्षमता २२० एमएलडी इतकी असते, अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी दिली. मनपाच्या दीर्घकालिन योजनेत बांध तयार करण्याबाबत प्रस्ताव तयार करा, असे आदेश दीपराज पार्डीकर यांनी दिले. जलशुद्धीकरण केंद्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा व नागरिकांना पाणी शुद्धस्वरूपात मिळेल याची विशेष काळजी घेण्यात यावी, असे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.