नागपूर :रात्री उशिरा झालेल्या नाट्यमय कारवाईत, पोलिस उपायुक्त (झोन 1) लोहित मतानी आणि त्यांच्या पथकाने नागपुरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर एस पबमध्ये सुरू असलेल्या डान्सबारवर छापा टाकला. यादरम्यान महिला अश्लील नृत्य करत असताना तसेच उपस्थित ग्राहक नोटांचा वर्षाव करत असताना पोलिसांना आढळले.
पोलिस आयुक्त रविंदर सिंगल आणि पोलिस सहआयुक्त निसार तांबोळी यांच्या निर्देशानुसार, डीसीपी मतानी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
केवळ ऑर्केस्ट्रा संगीतासाठी परवानगी असलेल्या या पबमध्ये सर्रासपणे डान्सबार सुरु असल्याचे आढळले. यानुसार महाराष्ट्र अश्लील नृत्य प्रतिबंधक कायदा आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण कायदा, 2016 च्या कलम 8(4) चे उल्लंघन करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी बारमध्ये डान्स करणाऱ्या महिलांवर फेकलेल्या नोटा जप्त केल्या.ज्या एकूण 37,500 रुपये इतक्या आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार महिला गायिका आणि नर्तकांसह एकूण 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील एका महिलेसह या महिलांना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
आरोपींमध्ये बार मालक जय बलदेव हिराणी (42, रा. पांडे लेआउट, खामला), पबचे व्यवस्थापक राजू लालचंद झांबा (59, रा. महादेव हाइट्स, 502, नारी, जरीपटका), रोखपाल देवेंद्र रामकृष्ण शेंडे (38, रा. एकात्मता नगर, शिवणगाव रोड, जयताळा) यांचाही समावेश आहे.