-आभासी वर्गासाठी आईने दिला भ्रमणध्वनी,देवदूताप्रमाणे वेळेवर पोहोचले पोलिस
नागपूर: भ्रमणध्वनीच्या अति नादाने त्यांच्या जीवनात अमावास्येची रात्र होण्याची वेळ आली होती. मात्र, देवदूताप्रमाणे वेळीच आलेल्या पोलिसांमुळे त्यांच्या आयुष्यात पौर्णिमेचा चंद्र प्रकाश देऊन गेला. पोलिस वेळेवर पोहोचले नसते तर…! त्याने तिन्ही बालिकांना स्वप्नाच्या जगात नेऊन उमलण्यापूर्वीच त्या कुस्करल्या गेल्या असत्या. दैव बलवत्तर म्हणून त्या सुरक्षित आहेत. हा गंभीर आणि पालकांना सतर्कतेचा इशारा देणारा प्रकार सोमवार ५ जुलै रोजी इतवारी रेल्वेस्थानकावर उघडकीस आला.
आर्थिक स्थिती कशीही असली तरी मुलांना शिक्षण मिळावे अशी प्रत्येक आई-वडिलाची इच्छा असते. त्यासाठी पोटाला चिमटा घेऊन शिक्षणासाठी वेळप्रसंगी पालक कर्ज घेतात. आभासी वर्गासाठी भ्रमणध्वनी आवश्यक असल्याने प्रत्येक पालक मुलांना तो घेऊन देतात. मात्र शिक्षण केवळ नावापुरतेच राहिले. मजुरी करणारे पालक पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर निघताच मुले यु ट्यूब, व्हॉट्स अॅप, इंस्टाग्राम आणि समाज माध्यमावर सक्रिय होतात.
गोपालनगर झोपडपट्टी परिसरातील मीना (काल्पनिक नाव) इयत्ता ९ वीत शिकते. वडिलांचे छत्र हरपले. आई मजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करत आहे. आर्थिक स्थिती खालावली असतानाही अभ्यासासाठी मीनाला भ्रमणध्वनी घेऊन दिला. यावरून मीनाची एका व्यक्तीशी ओळख झाली. त्या शक्कलबाजाने मीनाला रंगबेरंगी स्वप्न दाखविले. त्याची मीनाला भुरळ पडली. त्याने तिला डोंगरगडला बोलाविले. ही बाब तिने दोन मैत्रिणीला सांगितली. ठरल्याप्रमाणे तिघीही डोंगरगडला जाण्यासाठी तयार झाल्या.
सोमवारी सकाळी १०.३० वाजता त्या घराबाहेर पडल्या. त्यांनी थेट इतवारी रेल्वेस्थानक गाठले. त्यांना महाराष्ट्र एक्सप्रेसने गोंदिया व्हाया डोंगरगडला जायचे होते. त्या फलाट क्रमांक ४ वर गाडीच्या प्रतीक्षेत होत्या. दरम्यान लोहमार्ग पोलिस हवालदार अविनाश ननावरे, पोलिस शिपाई दीप्ती बेंडे, पोलिस हवालदार नामदेव सहारे आणि पोलिस नायक धोटे गस्तीवर असताना १३ ते १४ वयोगटातील मुलींवर त्यांचे लक्ष गेले. अल्पवयीन असल्याने त्यांची विचारपूस करण्यात आली. सुरुवातीला त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवरून कुटुंबीयांशी संपर्क साधला असता सर्व प्रकार उघडकीस आला. तिघांचेही पालक रेल्वेस्थानकावर आले. पोलिसांनी कागदोपत्री कारवाई आणि खात्री केल्यानंतर मुलींना त्यांच्या स्वाधीन केले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तिन्ही मुली सुरक्षित असल्याने इतवारी पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.