नागपूर : नागपुरातील लकडगंज येथील बालाजी रोडवर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीतून विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. शेख समीर असे मृतक मुलाचे नाव असून अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील रहिवासी आहे. या घटनेच्या निषेधार्थ मृताच्या कुटुंबीयांनी महावितरणवर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत या निषेधार्थ आंदोलन केले.
माहितीनुसार, शेख समीर हा तरुण शनिवारी दुपारी लकडगंज येथील बालाजी रोडवरून जात असताना महावितरणच्या डीपीचा त्याला धक्का लागला.
तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर संतप्त कुटुंबीय व शहर काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभाग युवकाचा मृतदेह घेऊन महावितरण कार्यालयात पोहोचले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
अशा परिस्थितीत नुकसान भरपाई तसेच या घटनेस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणकडे विजेच्या डीपीमधून ठिणगी उडत असल्याच्या तक्रारी येथील स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या.मात्र याकडे सातत्याने महावितरणकडून दुर्लक्ष करण्यात येत होते.