कोरोना कन्ट्रोल रुम आता मनपा झोन स्तरावर
नागपूर: कोरोनावर प्रभावी नियंत्रण करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेनी क्षेत्रीय स्तरावर कोव्हीड नियंत्रण कक्ष स्थापित केले आहे. कोरोनासाठी अधिकच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षणासाठी संबंधित झोनचे सहाय्यक आयुक्तांना कोव्हीड नियंत्रण कक्षाचे नोडल ऑफिसर नियुक्त केले आहे. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार म.न.पा.च्या सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधी चे आदेश निर्गमित केले आहे.
आतापर्यंत कोव्हीड नियंत्रण कक्ष फक्त मनपा मुख्यालयातच कार्यरत होते. मागच्या महिन्यापासून शहरात कोरोना रुग्ण बाधितांची वाढती संख्या व मृत्यूची लक्षणीय संख्या लक्षात घेता क्षेत्रीय स्तरावर कोव्हीड नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून कोव्हीडवर प्रभावी नियंत्रण करण्यास मृत्यू संख्या कमी करण्यात मदत मिळेल.
या निर्णयानुसार दहा झोनचे सहाय्यक आयुक्तांना कोरोना रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, कोरोना चाचणी केन्द्र स्थापित करुन मोठया प्रमाणात चाचण्या करणे, चाचणी केन्द्राचे दैनंदिन व्यवस्थापन करणे, खाजगी रुग्णालयातील बेड व्यवस्थापन करणे, रुग्णवाहिका व शववाहिका यांचे व्यवस्थापन करणे, मृत कोरोना रुग्णांचे डेथ अनलिसीस करणे, प्रतिबंधित क्षेत्रातील अनुषंगीक कार्यवाही करणे, तथा परिसर निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच या सहाय्यक आयुक्तांना मनुष्यबळ अधिग्रहित करणे, आवश्यक कामकाज सोपविणे इ. चे आयुक्तांना असलेले अधिकारही प्रदान करण्यात आले आहे.
.या अनुषंगाने सर्व संबंधित नागरिकांनी कोरोना विषयक उक्त नमूद बाबीसंदर्भात आपले मनपा झोन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.