कॅटचे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाला आदेश
नागपूरः आठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात चार महिन्यात राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा, असे आदेश केंद्रीय प्रशासकीय लवादाने (कॅट) दिले.
राजेश सबनीस, राहुल गुरनुले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कॅटच्या सदस्य हरविंदर कौर ओबेरॅाय यांनी हा आदेश दिला.
याचिकाकर्ते आठही कर्मचारी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात फायरमन पदावर कार्यरत आहेत. केंद्र सरकारने ६ जुलै २०१७ ला केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची सर्वत्र अंनलबजावणी करण्यात आली.
पण, याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कॅटमध्ये धाव घेतली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. नाझीया पठाण व ॲड. मंगेश राऊत यांनी बाजू मांडली. याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर कॅटने याचिकाकर्त्यांनी आदेश अग्निशमन महाविद्यालयाला निवेदन द्यावे व महाविद्यालयाने चार महिन्यात त्यावर निर्णय घ्यावा, असे आदेश दिले.