नागपूर : राज्यसरकारने दुधाला २७ रुपये दर घोषित केला होता परंतु तो दर दिला नाही. दुधपावडर उत्पादकांना तीन रुपये अनुदान दिले पण त्याचा उपयोग झाला नाही. दुधाची पावडर संपली नाही. सरकारने घेतलेल्या एकाही निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दुध दराबाबत विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारवर केला.
दुधाला जाहीर केलेला दर सरकार देत नाही. शेतकऱ्यांना संपावर का जावं लागतं याचा विचार व्हायला हवा. तुमच्या कार्यकाळात दुधाच्या धंद्याचे तीनतेरा झाले अशी नोंद होवू नये याबाबत सरकारने आणि संबंधित मंत्र्यांनी खबरदारी घ्यावी आणि या विषयावर दोन दिवसात बैठक बोलवावी अशी मागणी दादांनी केली. दरम्यान कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांना द्यावे अशीही मागणी पवारांनी केली.
यावर दुग्धमंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन दोन दिवसात बैठक लावली जाईल अशी माहिती सभागृहात दिली. मात्र दोन दिवसात चर्चा होणार असेल तर ही लक्षवेधी राखून ठेवा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. महादेव जानकर, विनोद तावडे यांनी उत्तर देवूनही विरोधकांचे समाधान झाले नाही त्यामुळे शेवटी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात बैठक बोलवली जाईल, तोपर्यंत लक्षवेधी राखून ठेवली जाईल असे सांगितल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ही लक्षवेधी राखून ठेवण्यात आल्याचे जाहीर केले.