नागपूर : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा स्थापन झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीने महाराष्ट्रात सत्तासुद्धा स्थापन केली आहे.
शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेतेही सत्तेत सहभागी झाले. लोकसभा आणि विधानसभानंतर आता महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार अशी चर्चा आहे. त्यामुळे महायुती महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही एकत्रित लढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महूसलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, महायुतीने एकत्रित लढायचे की स्वबळावर याचा निर्णय जिल्हाध्यक्षांना घ्यायचा आहे. ते जे ठरवतील त्याला भाजपचा पाठिंबा राहील. कोणावरही महायुतीचा निर्णय लादणार नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
गेल्या तीन वर्षांपासून नागपूर, मुंबईसह अनेक शहरात महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. याठिकाणी महापालिकेत प्रशासक राज सुरु आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाची यावर अंतिम सुनावणी होणार आहे. त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती आहे.