मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. मागील वर्षी २० जूनला शिंदे यांनी शिवसेनेत फूट निर्माण करत आपली वेगळी चूल मांडली होती. आज या घटनेला १ वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सडकून टीका करण्यात येत आहे. तर २० जून हा जागतिक गद्दार दिवस साजरा करण्यात यावा, असे पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला लिहिले आहे.
२० जून २०२२ रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे यांनी बंडखोरी करत सुरतला पळ काढला. शिवसेनेच्या ४० आमदारांसह शिंदे अगोदर सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात नवीन सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी एका-एका आमदाराने ५० खोके (५० कोटी) रुपये घेतले असल्याचा आरोप करण्यात आला.
यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल. संयुक्त राष्ट्र संघटनने जाहीर केल्यानंतर २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतो. त्याप्रमाणे २० जून हा ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे.