नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक १५ काचीपुरा येथे नाग नदीवरील पूलाचे रविवारी (ता.२७) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नासुप्रचे विश्वस्त ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, नगरसेविका रुपा राय, नगरसेविका उज्ज्वला शर्मा आदी उपस्थित होते.
प्रारंभी केंद्रीय नितीन गडकरी यांनी पूलाच्या निमिर्ती कार्याच्या नामफलकाचे लोकार्पण केले. पूलाची पाहणीही यावेळी त्यांनी केली.
धरमपेठ झोन अंतर्गत काचीपुरा येथे कुसुमताई वानखेडे सभागृहाच्या बाजूला नाग नदीवरील पूलाची दुरावस्था झाली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना येण्याजाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. मुख्य मार्गावर असणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक रहिवासी नागरिकांसाठी पूलावरील वाहतूक सोयीस्कर ठरते. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पूलाचे कार्य व्हावे यासाठी नगरसेविका रूपा राय यांच्यामार्फत महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे विनंती करण्यात आली. महापौरांनी नागरिकांची सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने या पूलाचे नूतनीकरण कार्यासाठी आवश्यक ती मदत करून सर्व अडथळे दूर केले. पूलाच्या निर्मितीबद्दल महापौर आणि स्थानिक नगरसेवकांमार्फत घेण्यात आलेल्या पुढाकाराबद्दल ना. नितीन गडकरी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
परिसरातील नागरिकांना पुलाच्या नवनिर्मितीमुळे मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांमार्फत पूलाच्या निर्मितीबद्दल महापौर दयाशंकर तिवारी व पुढाकार घेणाऱ्या नगरसेविका रूपा राय यांचे आभार मानले.