राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते ‘वेबनागपूर’चे लोकार्पण : आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेटचीही सुविधा.
नागपूर : वेगवेगळ्या सुविधांसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळावर जाण्याऐवजी आता एकाच संकेतस्थळावर इलेक्ट्रिक, पाणी, कर, मोबाईलसह सर्व प्रकारचे बिल भरण्यासह पासपोर्ट, पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. एवढेच नव्हे आधार कार्ड डाऊनलोड, दुरुस्ती, जिल्हाधिकारी, महापालिकेसंबंधी तक्रारीही घराच्या दिवानाखान्यातून करता येणार आहे.
सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी तयार केलेल्या www.webnagpur.com या संकेतस्थळाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी सदर येथील राजभवनात लोकार्पण केले. ‘वेबनागपूर’ संकेतस्थळाची माहिती शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना घरीच ऑनलाईन सेवेचा लाभ द्यावा, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी पारसे यांच्याकडे व्यक्त केली. या संकेतस्थळावर महापालिकेचा मालमत्ता कर, पाणी कर, वीज बिल भरता येणार असून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय विविध कंपन्यांच्या सिलिंडर गॅससाठी, बीएसएनलसह विविध कंपन्यांचे मोबाईल बिल भरणे किंवा रिचार्ज करणे, रेल्वेचे आरक्षण, एसटी बसचे आरक्षण, डिश टीव्हीसाठी बिल भरण्यासाठीही ‘वेबनागपूर’ संकेतस्थळाचा वापर नागरिकांना करता येणार आहे.
नागरिकांंना या संकेतस्थळावरून पोलिस तक्रार करता येणार आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सातबारा काढणे, पाहणे, आधार कार्ड डाऊनलोड करणे, अपडेट करण्याचीही सुविधा संकेतस्थळावर आहे. एअर इंडिया, इंडिगो, स्पाईस जेट, गो फर्स्ट, विस्टारा या कंपन्यांच्या विमानाचे तिकिटासाठीही नोंदणी करता येणार आहे. कोर्ट केसेसचे स्टेटस, भीम ॲप डाऊनलोड करणे, नागपूर विद्यापीठाचा निकाल बघणे, एनसीईआरटीची पुस्तके ऑनलाईन बघणे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, इन्गू विद्यापीठ, दहावी, बारावी बोर्ड संबंधी माहिती, निकालही विद्यार्थ्यांना काढता येणार आहे.
वाहनचालकांना ई-चालान भरता येणार आहे. याशिवाय राज्यातील सर्वच प्रमुख वृत्तपत्राची लिंक देण्यात आली असल्याने नागरिकांना या संकेतस्थळावर स्वतःच्या शहरातील घटनांचे विश्लेषण वाचता येणार आहे. माहिती अधिकार संबंधीही लिंक देण्यात आली आहे. एकूणच एकाच संकेतस्थळावर सर्व सुविधा नागरिकांना मिळणार आहे.
निःशुल्क प्रशिक्षण
या संकेतस्थळासाठी नागरिकांना निःशुल्क नोंदणी करून सदस्य कार्ड घेता येईल. सदस्य कार्ड घेतलेल्या
नागरिकांना सोशल मीडिया वापर तसेच लहान व्यावसायिक व उद्योजकांना सोशल मीडियातुन व्यवसायसंबंधी वर्षभर निःशुल्क मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
नागरिकांना वेगवेगळ्या सुविधांसाठी अनेक संकेतस्थळावरून जाऊन वेळ घालविण्याऐवजी एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्या, या हेतूने ‘वेबनागपूर’ हे संकेतस्थळ तयार करण्यात आले. नागरिकांसाठी हे संकेतस्थळ सुरक्षित आहे. यातून वापरकर्त्याची माहिती कुणालाही होणार नाही. संकेतस्थळ वापर तसेच एकूणच सोशल मिडियाबाबत शहरातील नागरिकांसाठी शिबिरेही घेण्यात येणार आहे.
– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.