– हत्या करून मृतदेह जाळल्याचा गुन्हा
नागपूरः प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पोलीस ठाण्यात हजर असताना दखलपात्र गुन्हा न करता त्याची सत्यता पडताळून विलंबाने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच तपासातील त्रुटी या बाबी लक्षात घेऊन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांनी आंध्रप्रदेश विरूद्ध पुनाती रामलू या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षकांना विचारात घेऊन खुनाच्या गुन्ह्यातील आठ आरोपींची निर्दोष सुटका केली.
रणजीत ईश्वर राठोड, संजय सुरेश पवार, विलास ईश्वर राठोड, ईश्वर सरदार राठोड, सुरेश बापुराव पवार, बंडू सुरेश पवार, रतन रूसाल जाधव आणि लक्ष्मण तोताराम जाधव सर्व रा. जुनोनी, उमरेड अशी निर्दोष सुटका करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. १४ मे २०१५ रोजी मद्यरात्री २ वाजता शालीक जाधव याचा आरोपींनी खून करून गावाजवळच्या पांढराबोडी तलावाजवळ मृतदेह जाळल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. आरोपींविरूद्ध न्यायालयात खटला चालवण्यात आला. या प्रकरणी न्यायालयाने साक्षीदारांची साक्ष तपासली व सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकला. यानंतर निकाल नोंदवताना न्यायालयाने घटनेच्या दिवशी सकाळी ६ वाजता मृताचा भाऊ रामप्रसाद व त्याची पत्नी रेखा जाधव ही पोलीस ठाण्यात गेले होते. पण पोलिसांनी रामप्रसादच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला नाही. ते ९ वाजता घरी परतले व पोलिसही पडताळणी करण्यासाठी घटनास्थळी गेले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. बचाव पक्षाने दखलपात्र गुन्ह्यांत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल न करता घटनेची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात. पोलिसांनी विचाराअंती विलंबाने हा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी पुराव्यांशी खोडतोड केल्याचा दावा केला व त्याकरिता आंध्रप्रदेश विरूद्ध पुनाती रामलू या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणांचा आधार घेऊन अशा खोडतोडपूर्ण तपासावर विश्वास ठेवता येणार नाही, असा युक्तिवाद केला. तसेच अशा तपासातील साक्षीदारांचे आरोपींविषयी जबाब शंकास्पद असून कन्हैय्या मिसर विरूद्ध स्टेट ॲाफ बिहार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार त्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असा दावा केला. हा युक्तिवादही न्यायालयाने ग्राह्य धरला व सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली. आरोपींच्यावतीने ॲड. आर. के. तिवारी, ॲड. सौरभ त्रिवेदी, ॲड. मिनाक्षी गणवीर, ॲड. रिषभ शुक्ला, ॲड. मंगेश राऊत, ॲड. अर्पण लद्दड, ॲड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले.
डीएनए चाचणीही संशयास्पद:
आरोपींच्या कपड्यांवर मृताच्या रक्ताचे डाग सापडले होते. ते रक्त मृताचेच होते, हे डीएनए तपासणीत सिद्ध झाले होते. पण, पोलिसांच्या दस्तावेजानुसार आरोपींकडून जप्त केलेले कपडे व प्रत्यक्षात जप्त करण्यात आलेल्या कपड्यांमध्ये बरीच विसंगती आहे. शिवाय अनेक कपडे जप्त करताना पोलिसांनी घालून दिलेल्या दिशानिर्देशांचे पालनही केले नसल्याचे, आरोपींच्या वकिलांनी सिद्ध केले. यामुळे डीएनए चाचणीचा अहवाल सकारात्मक असला तरी त्यावर पूर्णपणे विश्वास टाकता येणार नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले.
मृतदेह जाळण्याच्या ठिकाणाची गावकऱ्यांमध्ये चर्चा:
आरोपींनी शालीकचा खून करून मृतदेह जाळण्याचा आरोप यात होता. मृतदेह जाळण्याची जागा आरोपी रणजीत राठोड याने दाखवली होती, असा दावा पोलिसांनी केला होता. पण, बचाव पक्षाच्या उलटतपासणीत फिर्यादी रेखा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार लालसिंग यांनी मृतदेह जळत असल्याची माहिती पोलीस गावात येण्यापूर्वीच गावकऱ्यांना होती, असे सांगितले. त्यामुळे आरोपीने मृतदेह दाखवल्यानंतरच त्याची माहिती सर्वांना झाली, हा सरकारी पक्षाचा दावाही न्यायालयाने फेटाळला.