हिवरीनगर गणेश मंदिर : ‘वॉक अँड टॉक विथ महापौर’मधील तक्रारीवर कारवाई
नागपूर : ‘वॉक अँड टॉक विथ महापौर’ या उपक्रमांतर्गत महापौर संदीप जोशी शहरातील विविध उद्यानांमध्ये जाउन नागरिकांशी संवाद साधत आहेत. यादरम्यान येणा-या तक्रारींवर तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे. याची प्रचिती शुक्रवारी (ता.२९) आली. हिवरीनगर येथील गणेश मंदिराजवळील अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार प्राप्त होताच महापौर संदीप जोशी यांनी संबंधित अधिका-यांना सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले. महापौरांच्या निर्देशानंतर अगदी काही तासातच सदर अतिक्रमण तोडण्यात आले व नागरिकांना दिलासा मिळवून देण्यात आला.
‘वॉक अँड टॉक विथ महापौर’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी (ता.२९) लकडगंज झोन अंतर्गत गरोबा मैदान येथील भारत माता व डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये महापौरांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांकडून अतिक्रमण, कचरा, स्वच्छता आदींबाबत समस्या मांडण्यात आल्या. यातील अनेक वर्षांपासूनच्या अतिक्रमणाच्या समस्येवर नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेत महापौरांनी दिलेल्या निर्देशावरून लकडगंज झोनच्या अतिक्रमण पथकाद्वारे अतिक्रमण तोडण्याची कारवाई करण्यात आली. शहरातील अतिक्रमणामुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता महापौर संदीप जोशी यांनी कठोर पवित्रा घेतला आहे. त्यानुसार आता शहरात सर्वत्रच अतिक्रमण हटविण्याबाबत कारवाई होणार आहे..