नागपूर : दिल्लीच्या सीबीआयच्या पथकाने काल रात्री नागपुरातील एका महिलेच्या फ्लॅटवर गुप्तपणे छापा टाकला. ही कारवाई रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चालल्याची माहिती आहे. ही महिला काश्मीरची असून ती नागपुरातील नरेंद्र नगर येथे राहात असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील काही वर्षांपासून ती एका मोठ्या फ्लॅट स्कीममध्ये भाड्याने राहत आहे. तसेच वर्धा रोडवरील एका शाळेत शिक्षिका म्हणून ती कार्यरत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजता दिल्ली सीबीआयच्या विशेष पथकाने नरेंद्र नगर येथील फ्लॅट स्कीममध्ये राहणाऱ्या महिलेच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर काही तास सीबीआयचा तपास सुरू होता. रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या तपासात नागपूर सीबीआयचे उच्चपदस्थ अधिकारीही उपस्थित होते.
या फ्लॅटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून भाड्याने राहणारी महिला मूळची काश्मीरची असून वर्धा रोडवरील एका शाळेत शिक्षिका असल्याचे सांगण्यात येत आहे. हिलेचा पती अधूनमधून नागपुरात येत असतो. हा छापा का आणि कोणत्या कारणासाठी टाकण्यात आला? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पोलीस अधिकारी ज्या वाहनात आले होते ते दिल्ली डीएल सीरीजचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूर सीबीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला असून हे प्रकरण दिल्ली सीबीआयशी संबंधित असल्याने गोपनीयतेमुळे अधिक माहिती दिली नाही.
– रविकांत कांबळे