नागपूर: आज हनुमान जन्मोत्सवाच्या पावन दिनानिमित्त नागपूर शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झालं. सकाळपासूनच शहरातील विविध मोठ्या-छोट्या हनुमान मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांनी प्रभू हनुमानाची पूजा-अर्चना करून आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. परिसरात ‘जय बजरंग बली’ आणि ‘जय श्रीराम’ च्या जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेलं.
शहरातील तेलनखेडी, सीताबर्डी, महाल व इतर ठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये विशेष पूजा, हवन, सुंदरकांड पठण आणि भजन संध्यांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांची आकर्षक फुलांनी व रंगीबेरंगी दिव्यांनी सजावट करण्यात आली होती.
सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाच्यावतीने सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील नागरिकांमध्ये या उत्सवाबाबत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं.
जामसावली मंदिरात विशेष पूजा व ५६ भोगचा प्रसाद अर्पण –
प्रसिद्ध जामसावली हनुमान मंदिरातही रात्रीपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर विशेष आरती पार पडली. यावेळी हनुमानजींना ५६ भोग अर्पण करण्यात आले.