नागपूर :शहरातील पहिला आणि ऐतिहासिक पांचपावली फ्लायओव्हर आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. तब्बल ३० वर्षे जुना हा पूल आता पाडण्याचे काम सुरू झाले असून, त्याजागी एक आधुनिक आणि दीर्घ फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे, जो कमल चौक ते दिघोरी दरम्यानचा प्रवास सुलभ करेल.
१९९२ ते १९९४ दरम्यान बांधलेला हा पूल सुमारे १ किलोमीटर लांब आणि ६.५ मीटर रूंद होता. नागपूर-हावडा रेल्वे मार्गावरील फाटकांमुळे होणाऱ्या विलंबातून मुक्तता मिळवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट होते. मात्र आता या पुलाची अवस्था कमकुवत झाल्याने आणि वाढत्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेता, त्याच्या जागी ९ किलोमीटर लांब व ११ मीटर रुंद असा नविन फ्लायओव्हर उभारला जाणार आहे.
या कामासाठी मोठ्या यंत्रसामग्रींचा वापर केला जात आहे. ७०० टन क्षमतेच्या क्रेनच्या मदतीने पूल पाडला जाणार असून, डायमंड कटरने तो टप्प्याटप्प्याने तोडला जाईल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण सुरक्षेच्या उपायांसह राबवण्यात येणार आहे. अंदाजे २५ दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
रेल्वे रुळांवरील भागासाठी NHAI आणि रेल्वे विभाग संयुक्तपणे काही वेळ ट्रेन सेवा थांबवण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे पांचपावली परिसरातील नागरिकांना काहीसा त्रास होऊ शकतो. मात्र, वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नवीन फ्लायओव्हर पूर्ण झाल्यावर, कमळ चौक ते दिघोरीचा प्रवास ३० मिनिटांवरून फक्त १० मिनिटांत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.