– डेंग्यूवरील उपाययोजनांबाबत हनुमाननगर झोनला आढावा बैठक
नागपूर : डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर उपाययोजना करुन नियंत्रण आणण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या मलेरिया व फायलेरिया विभागातर्फे घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. धरमपेठ झोनच्या कर्मचा-यांमार्फत नागपूर सुधार प्रन्यासच्या जलतरण तलावाची (स्वीमिंग टँक) नुकतीच तपासणी करण्यात आली. अंबाझरी ले-आऊट येथील प्रन्यासच्या स्वीमिंग टँक परिसरात डेंग्यूची अळी आढळून आली. आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी त्वरीत औषध टाकून अळी नष्ट केली. यानंतर कर्मचा-यांनी अंबाझरी ले-आऊटच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली.
तसचे डेंग्यूवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने हनुमान नगर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभागातील नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्षेत्रीय कार्यालयात (हनुमाननगर झोन) गुरुवारी (ता. २९) पार पडली.
हनुमान नगर झोन सभापती कल्पना कुंभलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, सहायक आयुक्त साधना पाटील, नगरसेविका उषा पॅलट आदी उपस्थित होते. डेंग्यू डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी सध्या सर्वेक्षण सुरू असून घरांची तपासणी करण्यात येत आहे. कुलर, टायर अथवा अन्य ठिकाणी पाणी साचले असेल तर संबंधित नागरिकांनीते तात्काळ कोरडे करण्याबाबत जागरुक करण्यात येत आहे. संशयितांचे रक्त नमुने घेण्यात येत असून आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या सर्वेक्षणात नागरिकांकडे पोहोचण्यासाठी नगरसेवकांशी समन्वय ठेवून त्यांची मदत घ्या, असे निर्देश सभापती कल्पना कुंभलकर यांनी दिले. डेंग्यू कशामुळे होतो, तो होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी सांगितले. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शुक्रवारी (ता.३०) प्राप्त झोननिहाय अहवालानुसार शहरात ५१०५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यात २७० घरे ही दुषित आढळली. म्हणजे, या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. सर्वेक्षणामध्ये ५७ ताप असलेले रुग्ण आढळून आले. तर ८९ जणांच्या रक्ताचे नमूने तर १३ जणांचे रक्तजल नमूने घेण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान १५२६ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात २१२ कुलर्समध्ये डास अळी आढळून आली. मनपाच्या चमूद्वारे १९३ कुलर्स रिकामी करण्यात आले तर ४४५ कुलर्समध्ये १ टक्के टेमिफॉस सोल्यूशन तर ८१९ कुलर्समध्ये २ टक्के Diflubenzuron गोळया टाकण्यात आले. ६९ कुलर्समध्ये गप्पी मासे सुद्धा टाकण्यात आले.
गुरुवारी (ता.२९) प्राप्त झोननिहाय अहवालानुसार शहरात ८४३४ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यात ४३० घरे ही दुषित आढळली. म्हणजे, या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. सर्वेक्षणामध्ये १०३ ताप असलेले रुग्ण आढळून आले. तर १९४ जणांच्या रक्ताचे नमूने तर ३१ जणांचे रक्तजल नमूने घेण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान २८४६ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात २९८ कुलर्समध्ये डास अळी आढळून आली. मनपाच्या चमूद्वारे ३०१ कुलर्स रिकामी करण्यात आले तर ९२० कुलर्समध्ये १ टक्के टेमिफॉस सोल्यूशन तर १४३६ कुलर्समध्ये २ टक्के Diflubenzuron गोळया टाकण्यात आले. १८९ कुलर्समध्ये गप्पी मासे सुद्धा टाकण्यात आले.