Published On : Tue, Sep 12th, 2023

मनपा आरोग्य विभागाद्वारे डेंग्यू प्रतिबंधात्मक उपयायोजना व जनजागृती

Advertisement

नागपूर: नागपूर शहरात डेंग्यूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे कठोर उपाययोजना केली जात आहेत. नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या निर्देशानुसार, शहरातील सर्व झोन निहाय जनजागृती, घरोघरी सर्वेक्षण, औषध फवारणी, धूर फवारणी, कुलरमध्ये औषधी टाकणे, गप्पीमासे सोडणे या सर्व उपाययोजना नियमितपणे मनपातर्फे करण्यात येत आहेत. मात्र यानंतरही काही भागात डेंग्यूच्या रुग्णांची नोंद होते आहे, किंवा लारवा आढळतो आहे. अशा स्थितीत प्रत्येक नागरिकाने परिसरात व घरी स्वच्छता पाळणे आवश्यक आहे तसेच डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

डेंग्यू हा आजार डेंगी विषाणूमुळे होतो व त्याचा प्रसार एडिस इजिप्टाय नामक मादी डासाच्या चावल्यामुळे होतो. साठविलेल्या किंवा साठलेल्या पाण्यात भंगार साहित्य जसे – टायर, नारळाच्या करवंट्या, रिकामे डबे, पाण्याचे टाके, फ्रिज मागील पाण्याचे ट्रे, कुंडया, कुलर, ड्रेनेजच्या जाळ्या, ई. ठिकाणी या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे नागरिकांनी निरुपयोगी सामानाची विल्हेवाट लावावी. पाणी वाहते करावे, आठवडयातून कोणताही एक कोरडा दिवस पाळावा. लहान मुलांना संपूर्ण अंग झाकेल असे सैल कपडे घालावेत. असेही आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

डेंग्यूपासून बचाव व्हावा या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. मनपाच्या आशा सेविका तसेच परिचारिका घरोघरी जाउन जनजागृती करीत आहेत. घरामध्ये किंवा परिसरात कुठेही पाणी साचलेले आहे का, असल्यास त्यात औषध फवारणी करून किंवा पाणी जमा असलेली भांडी रिकामी करून डासोत्पत्ती होणारी स्थळे प्रतिबंधित केली जातात. याशिवाय घरात कुणालाही डेंग्यू सदृश्य लक्षणे असल्यास त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करतात. योग्य वेळी निदान आणि वेळीच उपचार घेतल्यास डेंग्यू लगेच बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरीकांनी डेंग्यू सदृश्य लक्षणे आढल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा. परिसरात किंवा घरी डेंग्यू रुग्ण आढळल्यास स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. मनपाची आरोग्य चमू सर्वेक्षणासाठी घरी आल्यास त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

ही काळजी घ्या

Ø घराच्या सभोवताल अथवा छतावर भंगार साहित्य – टायर, नारळाच्या करवंटया, रिकामे डबे, पाण्याचे टाके, कुडया, कुलर ई. ठिकाणी डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणे.

Ø आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.

Ø लहान मुलांना संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे.

Ø घरी असलेले सर्व कुलर बंद करून पाण्याची टाकी स्वच्छ पुसून कोरडी करावी.

Ø सभोवतालच्या परिसरातील साचलेले पाणी वाहते करावे

Ø पाण्याची भांडी, टाकी, ओव्हरहेड टॅक, यावर कवर झाकावे.

Ø डेंग्यू सदृश्य ताप आढळल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधुन वेळीच औषधोपचार करावा.