– मनपातर्फे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने ७५ ठिकाणी होणार शिबिर
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे शासकीय दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने महापौर दंत तपासणी शिबिराचा महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते बोरगांव येथे शुभारंभ झाला. ‘आझादी-७५’ अंतर्गत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने संपूर्ण शहरामध्य ७५ दंत तपासणी शिबिर घेण्यात येणार असून बुधवार (ता.२२) रोजी बोरगांव गिटटीखदान भागात दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक भूषण शिंगणे, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. वैभव यांच्यासह त्यांची संपूर्ण चमू उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील आरोग्य सुविधेकडे विशेष लक्ष देण्याच्या उद्देशाने विविध भागामध्ये, परिसरात वेगवेगळी आरोग्य शिबिर आयोजित करून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे कार्य करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे आरोग्य विभागाच्या वतीने शहरात डिसेंबर पर्यंत १०७ प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे व त्यादृष्टीने शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. अंधत्व निवारणाच्या दृष्टीने महापौर नेत्रज्योती योजनेंतर्गत मोतियाबिंदुची शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमातून महात्मे नेत्रपेढी येथे रुग्णांची नि:शुल्क शस्त्रक्रिया केली जाते शिवाय लेन्स व आवश्यक चष्मा सुद्धा नि:शुल्क देण्यात येत आहे. याच श्रृंखलेमध्ये आता दंत तपासणी शिबिराचे आयोजन होत असल्याचेही ते म्हणाले.
शिबिरामध्ये दातांची स्वच्छता, दातांमध्ये फिलिंग करणे, दात काढणे, खर्रा खाणा-यांना असलेल्या कॅन्सरच्या धोक्याबाबत तपासणीद्वारे योग्य माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय एक दिवसापेक्षा जास्त कालावधीच्या उपचाराबाबतही शिबिरामध्ये तपासणी करण्यात येणार आहे. यानंतर पुढील उपचार शासकीय दरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये केले जाईल. यासाठी तेथे शिबिराच्या माध्यमातून येणा-या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष व वेगळी व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये जास्तीत नागरिकांनी सहभागी होउन आवश्यक ती दंत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे.