Published On : Mon, Apr 27th, 2020

सतरंजीपुऱ्यातील नागरिकांची विलगीकरण कक्षात रवानगी

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती : नागरिक माहिती लपवित असल्याने उचलले पाऊल

नागपूर, : कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात हॉट स्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरातील नागरिक अद्यापही माहिती लपवित असल्याने तेथील बहुतांश लोकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत विलगीकरण करण्यात येणाऱ्या नागरिकांचा आकडा अंदाजे १२०० च्या घरात पोहचेल, अशी माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, सतरंजीपुरा परिसर नागपूरसाठी कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारीत आहेत. परंतु अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून लक्षात आली. कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या संपर्कातील सुमारे २०० वर नागरिकांनीही अशीच माहिती लपविली होती. त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्याने मोठा संसर्ग टळला. त्यातीलच पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा ८० पर्यंत पोहोचला आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपविली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. आताच उपाययोजना केल्या नाही तर संसर्गाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच तेथील नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी १००, आजच्या तारखेत ४५० नागरिकांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली असून उद्यापर्यंत हा आकडा १२०० च्या घरात जाईल, असेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या चमूला खरी माहिती पुरवा. समाजाचे शत्रू बनू नका. मानवतेचे दूत बना, असे आवाहन पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement