नागपूर: पावसाचा खंड पडल्यामुळे भात रोवणीवर सर्वत्र परिणाम झाला असतांना ड्रायस्पेलमधे जलयुक्तमुळे निर्माण झालेल्या जलसाठ्यातून पीक वाचविणे सहज शक्य झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या सिंमेट नाला बांधासह इतर कामांमुळे उपलब्ध झालेल्या जलसाठ्यामूधन भात पिकांना पाणी दिल्यामुळे भंडारबोडी येथील 124 हेक्टर मधील भात रोवणी यशस्वी झाली आहे. अशाच प्रकारे जिल्हयात जलयुक्तमधील पाणी देवून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचे संवर्धन केले आहे.
रामटेक तालुक्यातील भंडारबोड या गावासह सालईमेठा, हंसापूर, भंडारबोडी, मांजरी, गुगुलडोह आदी गावातील शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत घेतलेल्या शेततळे, नाला खोलीकरण, सिंमेट नाला बांध आदी कामामुळे उपलब्ध झालेल्या जलसाठ्यातून डिझेल पंपाच्या माध्यमातून भात शेतीला पाणी देवून भात रोवणी यशस्वी केली आहे. भंडारबोडी या गावाच्या परिसरात 366 हेक्टर क्षेत्रावर भातचे पीक घेतले जाते. त्यापैकी 124 हेक्टरला जलयुक्तमधील पाणी देवून धान शेती यशस्वी करण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे.
पावसाला चांगली सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भात रोवणीला सुरुवात केली. परंतु पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पहिल्या पावसात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांमुळे पाणी साठे उपलब्ध झाले होते. या जलसाठ्यामुळे भात पिकांचे संवर्धन शक्य झाले असल्याची माहिती प्रगतिशील शेतकरी सोमन सहारे यांनी दिली.
भंडारबोडी या गावात जलयुक्त शिवार अभियानांच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी 44 कामे घेण्यात आली होती. या कामांमुळे 124 टीएमसी जलसाठा निर्माण झाला होता. या जलसाठ्यामुळेच 124 हेक्टर क्षेत्रातील धान पिकांना वाचविणे शक्य झाले आहे. कृषी विभागातर्फे 15 ते 20 वर्षेापूर्वी 13 सिंमेट नाला बंधारे बांधण्यात आले होते. परंतु हे बंधारे जीर्ण झाले असल्यामुळे तसेच नाल्यात पूर्ण गाळ साचल्यामुळे साठवण क्षमता पूर्णपणे संपली होती. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत या नाला बांध दुरुस्तीसह नाला खोलीकरणाची 13 कामे, शेततळयांची 16 कामे व दोन साखळी बंधारे अशी 44 कामे पूर्ण झाली आहेत.
खरीप हंगामामध्ये प्रमुख पीक भात शेती असून या व्यतिरिक्त तूर व भाजीपाला आदी पिके घेण्यात येतात. आदिवासी बहूल असलेल्या शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पाण्याचा सिंचनासाठी पुरेपूर लाभ घेतला आहे. मागील वर्षी रब्बी हंगामामध्ये गहू, हरबरा, पोपट या सारखी पिके घेवून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले होते. मागेल त्याला शेततळे या कार्यक्रमात या एका गावात 16 शेततळी बांधण्यात आली. त्यामुळे 16 टीएमसी पाणीसाठी निर्माण झाला. तसेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे.
185 गावांमध्ये 2 हजार 913 कामे पूर्ण
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पहिल्या वर्षी 313 गावानंतर दुसऱ्या वर्षी 185 गावांची निवड करण्यता आली होती. या गावांमध्ये 2 हजार 913 जलसंधारणाची कामे पूर्ण झाली असून या कामांमुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. तसेच शाश्वत सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर पावसात खंड पडल्यानंतरी जलयुक्तच्या कामांमुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले. त्यामुळे शेतकरी शेतातील पिकांना वाचविण्यासाठी उपलब्ध पाण्याचा वापर करत आहेत.
जिल्हयात विविध यंत्रणातर्फे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत 185 गावात 3 हजार 407 कामे घेण्यात आली होती. त्यापैकी सर्वाधिक कामे कृषी विभागातर्फे 122 गावात 2 हजार 178 कामे सुरु करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 799 कामे पूर्ण झाली आहे. जलसंधारण, लघुसिंचन, भूजसर्वेक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा व वन विभागातर्फेही प्रस्तावित केलेली कामे पूर्ण झाली असून यावर 66 कोटी 93 लक्ष रुपये खर्च झाले आहेत.
जलयुक्त शिवार अभियानामुळे ड्रायस्पेलमध्ये पिकांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. मागेल त्याला शेततळे असो अथवा नाला खोलीकरण सिंमेट बंधाऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध असलेले पाणी गरजेनुसार पिकांना देण्याची सुविधा गावातच निर्माण झाली आहे. या सुविधेचा लाभ रामटेकसह जिल्हयातील इतरही तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे किमान भाताचे पीक वाचविण्याची मदत झालेली आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे भात पिकाचे अधिक उत्पादन घेण्याचा विश्वास जलयुक्त शिवारच्या माध्यमातून निर्माण झाला आहे. हे अभियान म्हणजे कृषी उत्पादनाच्या वाढीसह गावाच्या आर्थिक उत्पादनात निश्चितच वाढ होईल हा विश्वास निर्माण करणारा ठरला आहे…