मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे विरोधकांच्या गोटात वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. हा निकाल म्हणजे भाजपाचीच स्क्रिप्ट असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले. गंगापूर उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने फडणवीस उपस्थित असताना फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राहुल नार्वेकरांच्या निकालाचं कौतुक करतानाच ठाकरे गटावर हल्लाबोल केला. विधानसभा अध्यक्षांनी जो काही निर्णय दिला तो योग्य असल्याचे फडणवीस म्हणाले. आता कुणाच्याही मनात ही शंका असण्याचे कारण नाही की महाराष्ट्रात मजबूत सरकार आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
विरोधकांवर टीका करत फडणवीस म्हणाले की, ज्या लोकांना कायदा समजत नाही, ज्यांनी कधी कायदा पाळला नाही असे लोक टीका करतात. मला याचं आश्चर्य वाटत नाही. कारण हे तेच लोक आहेत जे सर्वोच्च न्यायालयात त्यांच्याविरोधात निकाल गेला तर सर्वोच्च न्यायालयावरही आरोप करतात. त्यामुळे त्यांनी अध्यक्षांवर आरोप केला याचं मला आश्चर्य वाटत नाही, असेही फडणवीस म्हणाले.
ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली नाही म्हणजे ते पात्र ठरले आहेत. अध्यक्षांनी त्यांना तांत्रिक कारणांमुळे पात्र ठरवले आहे. पण याचा अर्थ त्यांच्या गटाला शिवसेना मानने असे होत नसल्याचे फडणवीस म्हणाले.