बटरफ्लाय, फ्रॅगनन्स, रोज गार्डनची थीम : महापौर-आयुक्तांचा पुढाकार
नागपूर : नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारातून आता शहरातील बगिचे कात टाकत आहे. नागपूर शहरातील बगिच्यांचा आता ‘थीम पार्क’च्या आधारावर विकास होत शहरातील महत्त्वाचे बगीचे आता वेगवेगळ्या थीमवर आधारीत राहणार आहेत.
नागपूर शहरातील उद्यान हे नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याची योग्य देखभाल, दुरुस्ती व्हावी आणि नागरिकांसाठी तेथे मुलभूत सोयी उपलब्ध व्हाव्या, अशी मागणी महापौर संदीप जोशी यांच्या विविध जनसंवाद कार्यक्रमातून पुढे आली. त्याची दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी उद्यानातील स्वच्छतागृहे, ग्रीन जीम, विद्युत दिवे आदींची योग्य देखभाल दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. या ही पुढे जाऊन आता शहरातील सर्व मुख्य उद्यानांचा विकास ‘थीम पार्क’ म्हणून करण्याचे त्यांनी ठरविले आहे. त्यादृष्टीने कार्यही सुरू झाले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनीसुद्धा महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचे निर्देश दिले आहेत.
पूर्व नागपुरातील लता मंगेशकर उद्यानाला ‘बटरफ्लाय गार्डन’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या उद्यानात लेटिना, मोगरा, सूर्यफूल, गुलाब फूल फुलपाखरांना आमंत्रित करतील. झाडं आणि रोपट्यांनाही फुलपाखरांच्या स्वरूपात तयार करण्यात येत आहे.
हनुमाननगरातील महात्मा गांधी उद्यानाला ‘फ्रॅगनन्स’ थीम वर आधारीत तयार केले जाणार आहे. या ठिकाणी मधुमालती, पारिजात, मोगरा, कुंदा, जाई, रातराणी, सोनचाफा यासारखे सुंगधी फुलझाडे लावण्यात आले आहेत. या झाडांचा सुगंध तेथे येणाऱ्या नागरिकांना मोहून टाकणार आहे.
नंदनवन येथील त्रीशताब्दी उद्यानात विविध प्रकारची फुले लावून तेथील वातावरण प्रसन्न आणि सुगंधित करण्यात येणार आहे. भारतमाता-डॉ. आंबेडकर उद्यान ‘रोझ गार्डन’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
कळमना रोड शांतीनगरला लागून असलेल्या नामदेव नगर या दोन एकर परिसरात पसरलेल्या उद्यानात नव्याने फुलझाडांची रचना करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला टिकोमचे १०-१२ फूट उंचीच्या झाडांना भरगच्च पिवळी फुले लागली आहेत. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार लवकरच या उद्यानातील तिन्ही बाजूला आपट्यांची गुलाबी रंगाची फुले असणारी झाडे लावून उद्यानाच्या सौंदर्यात भर घालण्यात येणार आहे. उद्यानातील विहिरीवरच कारंजे लावण्यात आले असून व्यावसायिक लॉनला लाजवेल इतका सुंदर तेथील लॉन साकारण्यात आला आहे. यामुळे या उद्यानात नागरिकांची गर्दी वाढली आहे.
काटोल रोडवर अमृत योजनेअंतर्गत दीड एकर परिसरात सन २०१८-१९ मध्ये जागृती कॉलनी उद्यान साकारण्यात आले. शबरी व इतर फूलझाडांची रचना या उद्यानात करण्यात आली आहे. वर्षभरातच या उद्यानाचा उत्तम विकास झाला. या उद्यानात नागरिकांकरिता बाबूंचे योगा शेड, मुलांकरिता खेळणी, मोठ्यांकरिता ग्रीन जीमची व्यवस्था करण्यात आली आहे. कधी काळी गडरचे पाणी जमा होत असलेल्या या जागेवर आता सुंदर उद्याना साकारल्याने नागरिकांना सोयीचे झाले आहे.
दयानंद पार्क होणार ‘ॲडव्हेन्चर पार्क’
उत्तर नागपुरातील जरीपटका परिसरातील दयानंद पार्क ॲडव्हेन्चर पार्क म्हणून विकसित होत आहे. त्यादृष्टीने तेथे वेगाने कार्य सुरू आहे. स्थायी समितीचे माजी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या या बगिच्याला विकसित करण्यासाठी निधीची तरतूद केली होती. स्काय वॉक, लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य, सुंदर लॉन, बदाम आणि बकुळची झाडे हे दयानंद पार्कमधील इतर काही वैशिष्ट्ये राहणार आहेत. गांधीबाग उद्यान ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यंच्या मार्गदर्शन आणि सहकार्यातून विकसित होत आहे.