नागपूर: देवेंद्र फडणवीस हे मागील ३० वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. ३० वर्ष राजकारणात सक्रीय राहून दोनदा नगरसेवक, दोनदा महापौर, पाच वेळा आमदार आणि एकदा मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना नगरसेवक पदाची देखील निवडणूक न लढलेल्या व ती जिंकून येण्याची अजिबात पात्रता नसलेल्या अतुल लोंढेंच्या फुकटच्या सल्ल्याची मुळीच गरज नाही, असा घणाघाती टोला भाजपा नेते, माजी महापौर संदीप जोशी यांनी लोंढेंना लगावला.
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या वक्तव्याचा माजी महापौर संदीप जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला.
जोशी म्हणाले, कधी काळी अशोक चव्हाण यांच्या मागे मागे फिरणारे अतुल लोंढे यांनी चव्हाण यांना टांग मारून आता नाना पटोले यांचे मांडलिकत्व स्वीकारले आहे. पक्षातील अनेक लोकांना ते नकोसे झाले आहेत. म्हणूनच स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी ते फडणवीस यांच्या सारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करीत आहेत. अतुल लोंढेंनी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावे, मागील दोन वर्षांपासून नागपूर शहरामध्ये अधिवेशन न घेता मुंबईत लपून बसलेल्या स्वत:च्या मुख्यमंत्र्यांबद्दल लोंढे यांनी बोलावे, दोन वर्ष विदर्भाच्या प्रश्नांबद्दल नागपूरात अधिवेशन न घेता त्याबद्दल मूग गिळून बसलेल्या काँग्रेस नेत्यांबद्दल त्यांनी बोलावे, दोन वर्ष सत्तेत असून देखील विदर्भाचे प्रश्न का सोडवू शकले नाहीत याचा त्यांनी विचार करावा. ना की फडणवीसांनी मुंबईत रहावे, मुंबईतून लढावे, झगमगाटात हरवले आहेत. अशा पद्धतीचे बालीश आरोप करून स्वत:ची फुकटची प्रसिद्धी करून घेणे लोंढेंनी थांबवावे, असाही टोला माजी महापौर संदीप जोशी यांनी लोंढेंना लगावला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ५ वेळा विधानसभा निवडणूक लढविली असून प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य हे वाढतच आले आहे. ही बाब त्यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास स्पष्ट करणारी आहे. परंतू ते लक्षात न घेता ज्यांनी कधीही नगरसेवकाची देखील निवडणूक लढविलेली नाही, अशांनी मुख्यमंत्री झालेले, मागील ३० वर्षापासून जे सक्रीय राजकारणात लोकांमधून निवडून गेलेले आहेत, अशा नेत्याला फुकटचा सल्ला देण्यापेक्षा स्वत:चा चेहरा आरशात बघावा आणि काँग्रेसने काय केले याबद्दल देखील विचार त्यांनी करावा, असेही जोशी म्हणाले. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या प्रश्नांसाठी किमान दोन आठवड्यांचे अधिवेशन तरी घेतलेले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून २ वर्ष नागपूरात विदर्भाच्या प्रश्नांसाठी अधिवेशनच घेतले गेले नाही, याबद्दल अवाक्षरही लोंढे काढत नसल्याची पुष्टी त्यांनी जोडली.
देवेंद्र फडणवीसांनी आरोप प्रत्यारोपापलिकडे काहीही केले नसल्याच्या अतुल लोंढेंच्या वक्तव्याच्या प्रत्युत्तरात संदीप जोशी म्हणाले, आरोप- प्रत्यारोप देवेंद्र फडणवीस करतात म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार किती नालायक सरकार आहे हे लोकांसमोर आणतात. सरकारचे प्रताप पुढे आणतात, हे सरकार विदर्भावर कसे अन्याय करत आहे ते सांगतात. सरकारमधील भ्रष्टाचाराचे एकेक प्रकरणे ते बाहेर काढत आहेत, म्हणून नागपूर शहरातीलच नव्हे महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीसांच्या मागे खंबीरपणे आहे, ती तिघाडी सरकारमधील कुणाच्याही मागे नाही, असेही ते म्हणाले.
कधीकाळी ज्यांची महाराष्ट्रात, देशात सत्ता होती तो पक्ष आता चवथ्या क्रमांकावर गेलेला आहे, याचा विसर लोंढेंना पडलेला असावा. अतुल लोंढे यांनी स्वत:चे आत्मपरीक्षण करावे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फुकटचा सल्ला देण्याची बालीश धडपड करू नये, अशा शब्दांत माजी महापौर संदीप जोशी यांनी लोंढेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.