नागपूर : भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, बंटी कुकडेंसह भाजपचे बडे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नागपूरमध्ये आज भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला दबदबा दाखवून दिला आहे.यावेळी त्यांच्या घरामध्ये त्यांचे कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचे औक्षण करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.महायुतीचे पुन्हा एकदा सरकार यावे यांसाठी शंखनाद केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची यंदाची ही सहावी विधानसभा निवडणूक आहे. त्यासाठी घरातून आणि हजारो कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
जनतेसह आईचा आशीर्वाद पाठीशी, नक्कीच विजयी होणार-
फडणवीस म्हणाले की, जनतेचा आणि आईचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. मागच्या सगळ्या निवडणुकांमध्ये चांगला विजय मिळाला, तसाच आता सहावा विजय देखील मोठा मिळेल. खूप चांगल्या मतांनी मी निवडणून येईल, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची नागपूरच्या संविधान चौकातून रॅलीला सुरुवात झाली होती. यादरम्यान जोरदार शक्तीप्रदर्शन, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि घोषणाबाजीही करण्यात आली. फडणवीस यांना आशिर्वाद देण्यासाठी उत्तराखंडहून नागा साधू देखील आले आहेत.