मुंबई: भारतीय जनता पक्षाने मागील १० वर्षात अत्यंत खालची पातळी गाठत खूनशी व कपटी राजकारण करुन विरोधकांना संपवण्याचे काम केले.
महाराष्ट्रातील काँग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सरकारी यंत्रणेला हाताशी धरून ब्लॅकमेल केले. भाजपच्या या खूनशी राजकारणावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला आणि आज अखेर सत्य समोर आले. विरोधकांना भ्रष्ट ठरवून बदनाम करण्याचे षडयंत्र रचणारा दुसरे कोणी नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत हे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी यांनीच उघड करत फडणवीसांच्या कपटी व खूनशी राजकारणाचा बुरखा टराटरा फाडला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हटले की, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभागाच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करावण्यास लावायचे. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अनेकांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करताच त्यांना सन्मानाने संवैधानिक पदे दिली. या सर्व प्रकरणाचा सुत्रधार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या सांगण्यावरूनच आपण काम केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही कटकारस्थान करण्यास फडणवीस यांनीच आदेश दिले होते हे उघड केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. भ्रष्टाचाराच्या नावाखाली महाराष्ट्रात पद्धतशीरपणे एक रॅकेट चालवले गेले व हे रॅकेट चालवणारा खलनायक देवेंद्र फडणवीस आहेत हे आता लपून राहिलेले नाही.
महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा लाभलेली आहे, या परंपरेला देवेंद्र फडणवीस यांनी कळीमा फासला आहे. विरोधकांना शत्रू समजून त्यांना बदनाम करणे, त्यांची राजकीय कारकिर्द संपवणे, खोटे आरोप लावून नाहक त्रास देणे हे सर्वांमागे फडणवीस यांचाच प्रताप होता.
सोमय्या यांनीच सर्व उघड केल्याने भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टचाराविरोधातील लढाई ही केवळ विरोधकांना संपवण्यासाठी होती हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही पण त्यांना ब्लॅकमेल करुन भाजपात सन्मानाने प्रवेश देणार हाच त्यांचा राजकीय अजेंडा आहे हे उघड झाले आह. आता जनताच भाजपाला घरी बसवून त्यांची जागा दाखवतील असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.