मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणावर असेलेले मनोज जरांगे पाटील यांनी मंत्रिमंडळ समितीच्या शिष्टाईनंतर आपले उपोषण मागे घेतले. मात्र मराठा आरक्षणासाठी त्यांचे आंदोलन सुरूच आहे.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली. यासंदर्भात सरकारने दोन महिन्यांची मुदत मागितली होती. मात्र त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मराठा आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. या प्रक्रियेत माजी न्यायमूर्ती न्या. सुनील शुक्रे आणि न्या. मारोती गायकवाड यांनी राज्य सरकारला बहुमूल्य सहकार्य केले, मी त्यांचे विशेष आभार मानतो. माझ्या सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचेही आभार , असे फडणवीस सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले.