नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने कंबर कसली आहे. यासाठी सर्व राजकीय नेते कामाला लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या नागपूरमधील मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पत्नी अमृता यांची साथ लाभणार आहे. त्यांनी दर महिन्याला किमान चार दिवस मतदारसंघासाठी द्यावेत, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या.
येत्या २०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. फडणवीस यांना लोकसभा निवडणुकीत रस नसून ते विधानसभा निवडणूक लढणार आहेत. यापार्श्वभूमीवर फडणवीस हे नागपुरात येऊन आपल्या मतदारसंघात आपली ताकद वाढवत आहे.
सध्या निवडणुकांच्या तोंडावर फडणवीस हे राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक प्रचार व इतर कामांत अधिक व्यस्त राहतील. हे पाहता त्यांना आपल्या मतदारसंघात लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी दर महिन्याला किमान चार दिवस असे चाळीस दिवस निवडणूक तयारीसाठी द्यावेत, अशी विनंती बावनकुळे यांनी केली. या अनुषंगाने अमृता फडणवीस यांचे कार्यक्रम आखण्यात येत असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.
या कार्यक्रमांर्गत अमृता फडणवीस या मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील. तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे. मतदारनोंदणी तसेच निवडणुकीसंदर्भातील इतर कामेही हाताळणार आहेत.