नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेवर आता भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलतांना भाष्य केले. केंद्रीय नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल, असे बावनकुळे म्हणाले आहे.
देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ट संघटक आहेत. त्यांना शासन आणि प्रशासनात काम करण्याचा मोठा अनुभव आहे. यामुळे संस्थेला मोठा फायदा होईल. मात्र, याबाबत केंद्रीय नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल. पण माझ्या मते केंद्रीय नेतृत्वाने कोणताही निर्णय घेतला तर ते मान्य करू. मात्र, महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेसाठी त्यांचे सरकारमधील स्थान महत्त्वाचे आहे. याशिवाय संस्थेतील पद हेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच राहावे, असे आमचे मत आहे. कारण ते आमचे नेते आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
दरम्यान देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी 1200 कोटींहून अधिक निधी दिला. या जिल्ह्याच्या विकासासाठी शेतकरी, शेतमजूर, जिल्हा रस्ते, जिल्हा परिषदेची कामे आणि सुमारे 75 विविध विभागांची विकासकामे करावयाची आहेत. एकेकाळी नागपूरसाठी 200 कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र, आता नागपूर जिल्ह्याला 1200 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, असेही बावनकुळे म्हणाले.