नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. अनिल देशमुख यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यानंतर आज नागपुरात फडणवीस यांच्या समर्थकांनी देशमुख यांच्यावर पोस्टरच्या मध्यमातून टीकास्त्र सोडले.
नागपूरच्या रामनगर परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून होर्डिंग लावण्यात आलं आहे. या होर्डिंगवर विकास वृत्ती असं लिहून त्याखाली देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर वसुली बुद्धी असं लिहून त्याखाली अनिल देशमुख यांचा फोटो लावण्यात आला आहे. अनिल देशमुख यांचा फोटो ब्लॅक बॅकग्राऊंडवर असून त्यासमोर तुरुंगात दाखविण्यात आलेला आहे. होर्डिंगचा हा फोटो अनिल देशमुख यांनी ‘एक्स’वर टाकत फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी! महाराष्ट्रात तुम्ही किती घाणेरडे आणि खालच्या थराचे राजकारण करत आहात, याचा नवीन अंक आज नागपूरच्या जनतेला पुन्हा एकदा तुमच्याकडून पाहायला मिळाला. लक्षात असू द्या… जनता जनार्दन आहे,असे ट्विट करत अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.