सातारा : राज्यातील कुठल्याही गावांनी मला जर विचारले तर मी म्हणेल आदर्श गाव पाहण्यासाठी धामणेरला जा. राज्यातील इतर गावांनी आदर्श घ्यावा असे पथदर्शी काम या गावाने केले आहे. त्याबद्दल ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
कोरेगाव तालुक्यातील धामणेर येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची पाहणी केली. यावेळी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आ. बाळासाहेब पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी करुन कम्युनिटी बायोगॅस प्रकल्पाचीही पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. यानंतर ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, धामणेरच्या ग्रामस्थांनी अतिशय चांगल काम केलेले आहे. ते पाहण्यासाठी मी आज आलो आहे. खरे तर मीच गावाचे अभिनंदन आणि आभार मानायला हवेत,असे भावोद्गार काढून, त्यांनी ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. आपली गावे आपण कशी चांगली करु शकतो, याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे धामणेर आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गावाने गरिबातल्या गरिबाचाही विचार केला आहे. 2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे ही प्रधानमंत्री यांची संकल्पना इथे साकार होत आहे. जिल्ह्यातील 7 हजार घरे आम्ही बांधायला घेतली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांचेही मी अभिनंदन करतो. पंडित दीनदयाल उपाध्याय योजना घरकुलांसाठी आणली आहे. शासनाची योजना उत्तमपणे यशस्वी केवळ ग्रामस्थांच्या पाठबळावरच होत असते, धामणेरकरांनी आपल्या कामाच्या माध्यमातून राज्यातील इतर गावांना आदर्श घालून दिला आहे.
राज्यातल्या उत्तमातील उत्तम गाव ठरणाऱ्या धामणेरकरांनी अन्य गावांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. मी निश्चितपणे केंद्र शासनाला विनंती करुन हे प्रशिक्षण केंद्र धामणेरमध्ये होण्यासाठी प्रयत्न करेन. गावाच्या पाठीमागे निश्चितपणे शासन उभे राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.
सरपंच शहाजी क्षीरसागर यांनी गावातील केलेल्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, चंद्रशेखर जगताप, आनंद भंडारी, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम पावसकर, अतुल भोसले, साताराचे नगरसेवक धनंजय जांभळे, आनंदराव कणसे, निवृत्त भारतीय कर अधिकारी अनिल पवार आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुढ्या उभारुन मुख्यमंत्र्यांचे स्वागत
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी धामणेर ग्रामस्थांनी सर्व घरावर गुढ्या उभ्या केल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करुन त्यांचे आपल्या गावात स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद
प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरकुल मिळालेल्या लाभार्थी शालिनी पवार यांच्याशी अगदी आस्थेवाईक विचारपूस करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संवाद साधला. शौचालयाचा नियमीत वापर करा. परिसर स्वच्छ ठेवा. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पुरस्कार प्राप्त धामणेर
जिल्हा स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार सन 2016-17.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार सन 2016-17
संत गाडगेबाब ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन 2001-02
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन 2003-04
संत ग्राडगेबाबा ग्राम स्वच्छताअभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन 2004-05
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा विभागस्तरावर द्वितीय पुरस्कार सन 2004-05
माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 2005 रोजी निर्मल ग्राम पुरस्कार.
जिल्हास्तरीय अस्पृश्यता निर्मूलन प्रथम पुरस्कार सन 2002
यशवंत पंचायत राज अभियान विभागस्तर प्रथम पुरस्कार सन 2004-05
विभागीयस्तर वसंतराव नाईक पाणी व्यवस्थापन प्रथम पुरस्कार सन 2003-04
शाहु फुले आंबेडकर दलित वस्ती सुधार अभियानात जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार सन 2006-07
राज्यस्तरीय वनश्री प्रथम क्रमांक सन 2006-07