धापेवाडा/नागपूर : श्री. विठ्ठल मंदिर देवस्थान धापेवाडा विकास आराखड्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन म्हणजे धापेवाडयाचा निश्चित विकासाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल असून येथील विकासासाठी राज्यशासन पुढेही सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे विविध सुविधा, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि नदी खोलीकरण व रुंदीकरण प्रकल्पाद्वारे धापेवाडा हे विदर्भातील प्रती पंढरपूर म्हणून अधिक विकसित करण्याच्या दिशेने होत असलेले मार्गक्रमण आहे. या गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. स्थानिक जनतेच्या मागणीनुसार कारंजा-पांढुर्णा रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
श्री. विठ्ठल मंदिर देवस्थान धापेवाडा विकास आराखडा अंतर्गत 164.61 कोटी खर्चातून देवस्थान व परिसरात विविध सुविधा उभारणे, पावसाच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शुद्धीकरण केंद्र उभारणे, येथील नदीचे खोलीकरण व रुंदीकरण कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.खासदार श्यामकुमार बर्वे,आमदार सर्वश्री अभिजीत वंजारी, डॉ.आशिष देशमुख,चरणसिंह ठाकूर,संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर महानगर विकास प्राधिकरण आयुक्त संजय मिना आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील विविध विकास कामांना गती मिळाली आहे. येथील तीर्थक्षेत्र विकास कामेही प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. पंढरपुरच्या धर्तीवर श्रीक्षेत्र धापेवाडा येथील विठ्ठल -रुक्मिनी मंदिर विकास आराखडा आखण्यात आला व त्याच्या खर्चास मागील वर्षी राज्य शासनाने मंजुरी दिली. या विकास आराखड्यांतर्गत गुणवत्तापूर्ण कामे करण्यात येतील. यातून मंदिर परिसर व गावाच्या विकासाच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावरील कामे पूर्ण होतील. यानंतरही पुढील विकास कामे हाती घेण्यात येणार असून राज्य शासन यास सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धापेवाडा येथे सर्व सुविधांनी सज्ज असे धर्मदाय हॉस्पीटल उभारण्याची आणि मध्यप्रदेश व महाराष्ट्राला जोडणारा संत्रा कॉरिडॉर उभारण्याची मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांना केली.
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, राज्य शासनाच्या विकास आराखड्यातून धापेवाडा येथील पुरातन विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पुनर्निर्माण होणार आहे. येथे प्रतिक्षालय, भव्य सभागृह, प्रशासकीय भवन, प्रार्थनालय, अद्यावत वाहन तळ, यासह मंदिरासमोरुन वाहणाऱ्या चंद्रभागा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. यातून शेतीला पिण्याला पाणी उपलब्ध होणार आहे. भूमिगत गटार व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या सर्व विकास कामांतून स्थानिकांचे जीवनमान उंचावणार आहे. हा विकास करत असतांना स्थानिकांनी कर्तव्याचे भान राखत आपला परिसर स्वच्छ सुंदर व नेटका ठेवण्यासाठी गरज आहे. येथे उत्तमोत्तम सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. या भागाच्या विकासाकरिता धापेवाडा येथील हातमाग व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी येत्या काही दिवसात धापेवाडा हातमाग इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भागातील संत्रा उत्पादकांनी नव नवीन तंत्रज्ञानाचा अंगिकार करुन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे असे ते म्हणाले. धापेवाडा विकास आराखड्याद्वारे परिवर्तनाची सुरुवात झाली असून या भागाच्या सर्वांगिण विकासाकरिता सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. बरेच दिवसांपासून स्थानिकांची मागणी असलेल्या कारंजा-पांढुर्णा रस्त्याचे बांधकाम करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश, निधी कमी पडू देणार नाही
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. धापेवाडा तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे या संदेशात म्हणण्यात आले.
यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार आशिष देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांनी प्रास्ताविक केले.
राज्य शासनाने १० ऑक्टोबर २०२४ रोजी १६४.६१ कोटी रुपयांच्या श्री. विठ्ठल मंदिर देवस्थान धापेवाडा विकास आराखडयाला मंजुरी दिली आहे.राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, वृद्ध व जलसंधारण विभाग आणि नागपूर महानगर विकास प्राधिकरणाद्वारे श्री. विठ्ठल मंदिर देवस्थान धापेवाडा विकास आराखडयातील चिन्हीत कामे केली जाणार आहेत.