मुंबई-औष्णिक प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने वैतागून मंत्रालयात विष प्राशन केलेल्या धुळे जिल्ह्यातील धर्मा मांगा पाटील (८०) यांचा रविवारी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात रात्री ११.३० वा. मृत्यू झाला.
आत्महत्या केलेल्या वडिलांना योग्य न्याय मिळेपर्यंत मृतदेह रुग्णालयातून हलवणार नाही, अशी भूमिका धर्मा यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी घेतली.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांची ५ एकर जमीन औष्णिक प्रकल्पासाठी संपादित केली होती. मोबदल्यात आजपर्यंत चार लाख रुपये मिळाले. नुकसान भरपाईसाठी ते गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे उंबरठे झिजवत होते. २२ जानेवारी रोजी ऊर्जामंत्र्यांच्या दालनात यासंबंधी बैठक होणार होती. मात्र ही बैठक ऐनवेळी रद्द झाली. त्यामुळे धर्मा यांनी विष घेतले होते.
प्रकृती बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे जाग आलेल्या ऊर्जा विभागाने या शेतकऱ्यास १५ लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र जमिनीवर विहीर, आंब्याची ६०० झाडे असून जमीन बागायती असल्याने योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी धर्मा यांच्या कुटुंबाकडून करण्यात आली.